रावेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणार

0
3

रावेर : प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उत्सुकतेला विराम देत उद्योजक श्रीराम पाटील यांनी आपण रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. अखेर रावेर विधानसभेसाठी उद्योजक श्रीराम पाटील यांचे राजकीय लॉन्चिंग झाले आहे. यासंदर्भात त्यांनी मॅक्रो व्हिजन अकॅडमी शाळेत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. पत्रकार परिषदेला गोपाल दर्जी, पिपल्स बँकेचे संचालक सोपान साहेबराव पाटील, विजय गोटीवाले, प्रवीण पाचपोहे, मॅक्रो व्हिजन अकॅडमीचे सचिव स्वप्निल पाटील, प्रमोद पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

रावेर विधानसभा निवडणूक मी लढवावी हे जनतेच्या मनात आहे. म्हणून आपण पुढची निवडणूक लढणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास रावेर विधानसभा निवडणूक लढणार आहे. दोन्ही निवडणुका एकत्र न झाल्यास आम्ही संपर्कात असलेल्या पक्षाने उमेदवारी दिली तर रावेर लोकसभा निवडणूक लढवेल अन्यथा उमेदवारी न मिळाल्यास शंभर टक्के रावेर विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याचे श्रीराम पाटील यांनी निश्चित केले आहे.

श्रीराम पाटील पुढे म्हणाले की, आम्ही रावेर मतदारसंघातील स्थायिक आहे. त्यामुळे सर्व-साधारण जनतेशी नाळ जुळलेली आहे. रावेर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी माझी तयारी आहे. मतदार संघात रोजगार उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडविणे, नवीन स्टार्टअप उभारणे, रस्ते यासह अनेक विषयांवर तयारी आहे. लवकरच मी ते जनतेसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेने आगामी निवडणुकीत मला एक संधी द्यावी. मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या रावेर विधानसभा मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मतदारसंघाच्या विकासासाठी एका संधीची गरज

जनतेने रावेर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी एक संधी द्यावी. तसेच यापुढे माझ्या परिवारातून कोणीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रत्येक टर्मला नवीन आमदार निवडुन देणारे जनता-जनार्दन येणाऱ्या २०२४ ला आपला आशीर्वाद कोणाला देतात, याकडे आतापासूनच सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here