डॉ. अमित हिवराळे यांच्या हस्ते सपत्नीक होणार रथोत्सवाची महापूजा
साईमत/फैजपूर/प्रतिनिधी
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यातील खान्देश विभागात येणाऱ्या जळगाव जिल्ह्याला खूप मोठी परंपरा आहे. फैजपूर येथे कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त काढण्यात येणाऱ्या रथोत्सवाला त्यामागचा इतिहास व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. पांडुरंग रथोत्सवाला १७६ वर्षाची परंपरा आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या स्वयंभू श्री पांडुरंगाचा रथोत्सव येत्या शुक्रवारी, १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता साजरा होत आहे. महाआरतीचे यजमान फैजपूर सद्गुरु हॉस्पिटलचे डॉ. अमित हिवराळे व यांच्या सुविद्य पत्नी डॉ. मृणालिनी हिवराळे या दाम्पत्याला मान मिळाला आहे. यावेळी परिसरातील प.पू. महामंडलेश्वर सर्व संत, महंत, कथा कीर्तनकार पंचकोशातील सर्व भाविक भक्तगण, सर्व धर्म पंथ समाज ट्रस्टी यावल- रावेर तालुक्यातील सर्व वारकरी, टाळकरी, भजनी मंडळ व इस्कॉन भक्तवंद यांची उपस्थिती लाभणार आहे.
खुशाल महाराज देवस्थानात दैनंदिन कार्यक्रम सुरू झाले आहे. त्यात पहाटे अभिषेक पूजा, काकड आरती, सकाळी ७ ते ८ गुरुपूजा, हनुमान चालीसा, सकाळी ९ वाजता बालभोग आरती, दुपारी १२ वाजता राजभोग आरती तर दुपारी ४ ते ६ भजन हरिपाठ सायंकाळी ६ ते ७, दरम्यान संध्या भोग आरती, सायंकाळी ७ ते ८ हरिकीर्तन, ११ नोव्हेंबरला पंकज महाराज मुक्ताईनगर, १२ रोजी ह. भ. प.संजय महाराज मोहराळा, १३रोजी योगी दत्तनाथ महाराज शिंदखेडा, १४ रोजी पोपट महाराज कासारखेडा अशा कीर्तनकारांचे रात्री ७ ते १० या दरम्यान कीर्तन होतील. यावेळी भाविक भक्तगणांची उपस्थिती लाभत आहे. १५ रोजी सकाळी ५ ते ६ काकड आरती, ७ वाजता दृष्ट काढणे, प्रसायदान, अभिषेक, रथ सजावट १० वाजता पंचपती भजनमाला दुपारी ३ वाजता देवस्थानात प्रमुख विश्वस्त गादीपती श्री संत खुशाल महाराजांचे सहावे वंशज प्रविण महाराज यांच्या हस्ते ब्राह्मण वृंदांच्या उपस्थितीत महापूजा होईल. ‘खुशाल महाराज की जय’ घोषणांनी पांडुरंगाची मूर्ती उचलून नगर प्रदक्षिणेसाठी रथात स्थानापन्न करण्यात येते. याप्रसंगी ब्राह्मण रुंद मंत्रघोष करतात. मंत्रघोष झाल्यानंतर तज्ज्ञ डॉ.उत्तम हिवराळे सपत्नीक यांच्या हस्ते महाआरतीही होईल. दुपारी ३ वाजता नगरप्रदक्षिणेसाठी रथोत्सव ‘श्री संत खुशाल महाराज की जय’ या घोषणाने प्रारंभ होईल.
रथोत्सव मिरवणुकीला भाविकांनी उपस्थिती देण्याचे आवाहन
रथोत्सवास सुरुवात रथ गल्लीतून होणार आहे. लक्कडपेट, मारुती गल्ली, सुभाष चौक, खुशाल भाऊ रोड, जुना हायस्कूलमार्गे ब्राह्मण गल्ली मार्गे, रथ निघेल. यावेळी फैजपुरसह परिसरातील भजनी मंडळ इस्कॉनसह भजनी मंडळ सहभागी होतील. १६ नोव्हेंबरला रात्री ७ ते १० दरम्यान पालखी सोहळा होईल. तसेच २१ रोजी सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यान भाऊराव महाराज मुक्ताईनगर यांचे काल्याचे किर्तन होईल. दुपारी ११ ते २च्या दरम्यान महाप्रसादाचेही आयोजन केले आहे. रथोत्सवाला रथ गल्ली मित्र मंडळ, फैजपूर व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे. रथोत्सव मिरवणुकीला भाविकांनी उपस्थिती द्यावी, असे पुंडलिक महाराज, प्रवीण महाराज, श्री संत खुशाल महाराज यांचे सातवे वंशज मिथिलेशदास आणि परिवार यांनी केले आहे.