साईमत धुळे प्रतिनिधी
देवपुरातील सुशीनाल्या किनारील अतिक्रमणाच्या नावाखाली वृक्षांची बेकायदेशीर सर्रासपणे कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून करण्यात आला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. संबंधितांविरोधात कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. वृक्ष संवर्धनाचे काम मनपाचे असतानाही मनपाच्यावतीने वृक्षांची कत्तल केल्याने वृक्षांचे संवर्धन करणार कोण? असा संतप्त प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
गेल्या 25 ते 30 वर्षापासून सुशी नाल्या किनारील लाला सरदार नगरात नारळ, बादाम, जांभूळ यांसह 15 ते 20 डेरेदार वृक्ष अस्तित्वात होते. वृक्षांची कत्तल करू नये, अशा आशयाचे निवेदनही मनपा प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र, अतिक्रमण विभागाच्या मनमानी कारभारामुळे वृक्षांची कत्तल झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दोन दिवसांपूर्वी सुशी नाल्या किनारील अतिक्रमण काढण्याची मोहीम मनपा प्रशासनाच्यावतीने केली होती. अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू असताना नागरिकांनी अतिक्रमण काढण्यास कुठलाही विरोध केला नाही. मात्र, अतिक्रमणाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल करताना नागरिकांनी विरोध करूनही अतिक्रमण विभागाच्यावतीने वृक्षांची कत्तल करण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या बेकायदेशीर कारवाई विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.