साईमत धुळे प्रतिनिधी
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही सुप्त कलागुण दडलेले असतात. या कलागुणांना व्यासपीठ मिळाले, तर त्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते. वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम व कलामहोत्सव हे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे प्रभावी माध्यम असून, प्रत्येक शाळेत शालेयस्तरावर असे कला महोत्सव आयोजित झाले पाहिजेत, असे प्रतिपादन आमदार राम भदाणे यांनी केले.
धुळे तालुक्यातील जुनवणे येथील पार्वताई इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित वार्षिक कलामहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ईश्वर युवराज खैरनार अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी विठ्ठल घुगे, उपसरपंच रावसाहेब पाटील, पोलीस पाटील जितेंद्र वाघ, विसरणेचे सरपंच रवींद्र पाटील, वेल्हाणेचे सरपंच राजू पहेलवान, किशोर सुकदेव पाटील, नगराज दगा पाटील, निलेश पाटील, नरेंद्र किसन पाटील, रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार भदाणे पुढे म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक प्रगतीपुरती मर्यादा न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे गरजेचे आहे. नृत्य, नाट्य, गायन, वक्तृत्व अशा विविध कला विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरतात. पार्वताई इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेला कलामहोत्सव कौतुकास्पद असून, चिमुकल्यांची सादरीकरणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
संस्थेचे अध्यक्ष ईश्वर युवराज खैरनार यांनीही आपल्या मार्गदर्शनात शाळा केवळ शिक्षण देण्यापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे केंद्र बनावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कलामहोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयश्री खैरनार यांनी केले. प्रास्ताविक संस्थाध्यक्ष ईश्वर खैरनार यांनी मांडले, तर मुख्याध्यापिका हर्षा पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गायत्री पाटील, आरती चव्हाण, सुवर्णा मोरे, आकांक्षा पाटील, सुरेखा पाटील आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
