राज्यासह खान्देशात पावसाचे ‌‘कम बॅक‌’

0
23

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात पावसाचे कमबॅक झाले आहे. हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून राज्यभरात पाऊस सुरू झाला आहे. खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळणार आहे.
देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे यावर्षी जून आणि ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. कृष्ण जन्माष्टमीला राज्यात पाऊस सुरु झाला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा हळू हळू वायव्येकडे सरकत आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‌‘यलो अलर्ट‌’ देण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला. आगामी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.

नंदुरबारात नाचले शेतकरी कुटूंब
नंदुरबार ः नंदुरबार जिल्ह्यातही तब्बल २७ दिवसानंतर पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनानंतर एका शेतकरी कुटुंबाने ढोल ताशांच्या गजरात नाचून आनंद व्यक्त केला आहे. नंदुरबार जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. कारण खरीपाची पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. पिकांसाठी पाण्याची मोठी गरज होती. त्यामुळे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा आनंदी झाला आहे. पावसासाठी शेतकऱ्यांकडून देवाकडे साकडे घालण्यात आलं होतं. यातच गुरूवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे एका शेतकरी कुटुंबाने ढोल ताशांच्या गजरात नाचून आपला आनंद व्यक्त केला आहे. हा आनंद साजरा करण्याऱ्या शेतकरी कुटुंबाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here