मनमाड रेल्वे स्थानकाची कार्यपद्धतीसह सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :
मध्य रेल्वे भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी दि.२४ सप्टेंबर रोजी मनमाड-भुसावळ रेल्वे मार्गाची विंडो ट्रेलिंग तपासणी केली. ही तपासणी विशेषत: ओएमएस (ऑसिलेशन मॉनिटरिंग सिस्टम) कोच मधून करण्यात आली. ज्यामध्ये रेल्वे मार्गावरील ट्रॅकची चालण्याची गुणवत्ता तपासण्यात आली.
तपासणीचा उद्देश म्हणजे गाड्यांची सुरक्षित आणि गुळगुळीत धाव सुनिश्चित करणे, जेणे करून प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक बळकटी मिळेल. ट्रॅकवरील धक्के, कंपनांची तीव्रता, वक्र आणि सिग्नल यंत्रणांची स्थिती तसेच रेल्वे गाड्यांच्या गतीदरम्यान ट्रॅकच्या क्षमतेचा सखोल अभ्यास यामध्ये करण्यात आला. ओएमएस कोचद्वारे या तपासणीतून मिळणारे डेटा रेल्वेच्या देखभाल कार्याला वैज्ञानिक आणि कार्यक्षम बनवण्यास मदत करतो.
याच अनुषंगाने विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री.अग्रवाल यांनी मनमाड रेल्वे स्थानकाचीही सविस्तर पाहणी केली. यामध्ये त्यांनी स्थानकावरील प्रवासी सुविधांची स्थिती, स्वच्छता, सुरक्षा उपाययोजना, तिकीट बुकिंग कार्यालय, वेटिंग हॉल्स तसेच दिव्यांग व वयोवृद्ध प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.पाहणी दरम्यान ऑपरेशनल एफिशियन्सी (कार्यपद्धतीतील कार्यक्षमता) आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना यावर विशेष भर देण्यात आला. रेल्वे कर्मचाऱ्यांना नियमित देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत सजग राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.