धुळे : प्रतिनिधी
जिल्ह्यातील साक्री येथील दरोडा आणि युवतीच्या अपहरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून संबंधित युवतीनेच ओळखीच्या युवकांच्या मदतीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला होता, हे उघड झाले आहे. खुद्द पीडित युवतीकडूनच पोलिसांना अशी माहिती देण्यात आल्याचे अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
साक्री येथील विमलबाई महाविद्यालयाच्या पाठीमागे दौलत बंगल्यात २५ नोव्हेंबरच्या रात्री साडेदहा वाजता चार ते पाच दरोडेखोर चेहरा कापडाने झाकून शिरले. त्यांच्याकडे बंदूक आणि चाकू असे शस्त्र होते. घरातील ज्योत्स्ना पाटील (४०) यांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करत त्यांनी घरातील सोने,चांदीच्या दागिन्यांसह ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ज्योत्स्ना यांच्या गळ्याला चाकू लावत त्यांचे हात-पाय आणि तोंड कापडाने बांधले. यावेळी घरात ज्योत्स्ना यांची २३ वर्षाची भाची निशा शेवाळे (रा. आदर्शनगर, साक्री) ही होती. दरोडेखोरांनी हत्यार रोखत दमदाटी करुन तिला ताब्यात घेत पळ काढला. दरोडेखोर गेल्यावर ज्योत्स्ना यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी धाव घेतली.
या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी दरोडेखोरांच्या तपासासाठी लागलीच चौफेर नाकेबंदी केली. युवतीच्या शोधासाठी चार पथके स्थापन केली आणि ती संशयितांच्या मिळून येण्याच्या संभाव्य ठिकाणी रवानाही केली. अपहृत युवतीने स्वतः तिच्या पालकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर पोलीस तिला आणण्यासाठी रविवारी सायंकाळी सेंधवा (मध्य प्रदेश) येथे पोहोचले. युवती सापडल्याने तिच्या नातेवाईकांना आणि पोलिसांनाही दिलासा मिळाला.
आता मात्र या घटनेची पार्श्वभूमी ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत. ज्या युवतीचे शस्रांचा धाक दाखवून अपहरण झाले होते, त्या युवतीनेच तिच्या संपर्कातील युवकांच्या माध्यमातून अपहरणाचा बनाव रचला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी खोटा दरोडा आणि अपहरण प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.