चाळीसगावचे चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या ‘शब्दस्पंदन’ चित्र चारोळी संग्रहाचे मुंबईत प्रकाशन
साईमत।चाळीसगाव।प्रतिनिधी।
मुंबईत हॉटेल ताज येथे झालेल्या अमेझिंग भारत ९ व्या इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये चाळीसगावचे चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या आगळ्या वेगळ्या अशा ‘शब्दस्पंदन’ चित्र चारोळी संग्रहाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. पुस्तकामध्ये चित्रकार दिनेश चव्हाण यांनी स्वतः चित्र रेखाटली आहे. त्यावर आधारित समर्पक शब्दरचना त्यांची स्वतःची आहे. शिवाय मुखपृष्ठ त्यांनी स्वतः आपल्या कलेच्या माध्यमातून तयार केले आहे. पुस्तकाला धुळ्याचे साहित्यिक, व्याख्याते, प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी यांची प्रस्तावना आहे. पाठराखण जळगावचे साहित्यिक डॉ.मिलिंद बागुल यांची आहे. अनुभवाचे दोन शब्द चित्रकार चेतन कुऱ्हाडे यांचे व आकाशवाणी निवेदिका पूनम बेडसे यांचे आहेत. नाशिकच्या ज्ञानसिंधु प्रकाशनाने हा दर्जेदार अंक तयार केला आहे.
‘शब्दस्पंदन’ चित्र चारोळी संग्रहाचे प्रकाशन हॉटेल ताज येथे प्रसिद्ध अभिनेते धीरजकुमार (सरगम, रोटी कपडा और मकान, बेहरूपिया फेम अभिनेते, निर्माता, दिगदर्शक) यांच्या हस्ते व प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रेरणा भट्ट यांच्या उपस्थितीत अमेझिंग इंडिया कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी फिल्म, टेलिव्हिजन व साहित्य कला क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना यावेळी इंटरनॅशनल एक्सलेंट अवॉर्डने गौरविण्यात आले. दिनेश चव्हाण यांचे कलाकृती सर्वत्र झळकत असतात. चित्र चारोळी, कथा, कविता, व्यंगचित्र, पोट्रेट, निसर्गचित्र आदी प्रकारात त्यांचा हातखंडा आहे. त्यांना आजवर अनेक सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.