संतापाचा उद्रेक; दोषींना अटक करण्याची जोरदार मागणी
साईमत जळगाव प्रतिनिधी :
जळगाव तालुक्यातील आमोदा येथे आदिवासी टोकरे कोळी समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मीक ऋषी यांच्या मूर्तीची समाजकंटकांकडून विटंबना झाल्याच्या संतप्त निषेधार्थ आज जळगाव शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून, दोषींना तात्काळ अटक करून कठोरातील कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
शिवतीर्थावरून मोर्चाची सुरुवात
या निषेध मोर्चाला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (शिवतीर्थ मैदान) येथून सुरुवात झाली. शेकडोच्या संख्येने जमलेल्या आदिवासी टोकरे कोळी समाजबांधवांनी हातात निषेधाचे फलक घेत “दोषींना अटक करा”, “आमच्या श्रद्धेचा अपमान सहन केला जाणार नाही” अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
मोर्चात समाजातील युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेला हा मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला आणि तेथे जोरदार निदर्शने करण्यात आली.
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
आमोदा गावात महर्षी वाल्मीक ऋषी यांच्या मूर्तीची विटंबना करून धार्मिक भावना दुखावणाऱ्या समाजकंटकांचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका समाजबांधवांनी मांडली.
या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, समाजबांधवांनी शांततेत मात्र ठामपणे आपला निषेध नोंदवला आहे.
