फैजपूर नगरपालिका प्रशासनाविरोधात मूलभूत सुविधांअभावी ठिय्या आंदोलन

0
67
Oplus_131072

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी

शहरात रस्ते, गटारी, साफसफाई, पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट यासह अत्यावश्‍यक नागरी सुविधांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. दुसरीकडे समस्या सोडविण्याऐवजी संबंधित अधिकारी बेजबाबदारपणे नागरिकांना उत्तरे देत आहे. शहरातील सर्वच समस्यांचे विषय घेऊन संतप्त सर्वसामान्य जनता व आजी-माजी नगरसेवकांनी थेट पालिकेवर धडक देत प्रमुख द्वाराजवळ तीन तास ठिय्या मांडला आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. इतकेच नव्हे तर मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून पालिका प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनानंतर प्रशासनाने तीन दिवसात समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले आहे.

विद्यमान नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पालिकेचे सूत्र प्रशासकांकडे आहे. त्यातच जवळपास वर्ष पूर्ण होईल. मुख्याधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर फैजपूर पालिकेला अद्यापही पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाला नसल्याने पालिकेचा पदभार प्रभारी मुख्याधिकाऱ्यांकडे आहे. दहा महिन्याच्या काळात जवळपास पाच प्रभारी मुख्याधिकारी बदलले. परंतु पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने जवळपास दहा अकरा महिन्यात फैजपूर शहरातील दैनंदिन साफसफाई, सुरळीत व वेळेवर पाणी पुरवठ्यासह अत्यावश्‍यक नागरिक सुविधांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असल्याने शहरवासीय कमालीचे त्रस्त झाले आहे.

शहरासाठी मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध असतांना गेल्या वर्षभरापासून अवेळी व अनियमित पाणी पुरवठ्याने नागरिक हैराण झाले आहे. मोठ्या प्रमाणावर स्ट्रीट लाईटची समस्या निर्माण झाली आहे. पावसाळा आला तरी शहरात नालेसफाई झालेली नाही. नागरिक तक्रार करून तक्रारींचे निवारण होत नाही. शहरात नियमित साफसफाई होत नसल्याने गटारी तुडुंब भरल्या आहे. कचरा उचलला जात नसल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अत्यावश्‍यक नागरी सुविधांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. दुसरीकडे समस्या सोडविण्याऐवजी संबंधित अधिकारी बेजबाबदारपणे नागरिकांना उत्तरे देत आहे.

शहरातील सर्वच समस्यांचे विषय घेऊन संतप्त सर्वसामान्य नागरिक व आजी-माजी नगरसेवकांनी थेट पालिकेच्या प्रमुख द्वाराजवळ तीन तास ठिय्या मांडला. इतकेच नव्हे तर ‘नगरपालिका प्रशासनाचा निषेध’, ‘नगरपालिका हाय हाय’, ‘पालिका प्रशासन मुर्दाबाद’, ‘दोषी अधिकाऱ्यांचा धिक्कार असो’, ‘हमारी मांगे पुरी करो’ ‘बेजबाबदार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे’ अश्‍या जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, तीन तास पदाधिकारी व नागरिकांना उन्हात ताटकळत बसावे लागले म्हणून संतप्त सर्वसामान्य नागरिक व आजी-माजी नगरसेवकांनी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून पालिका प्रशासनाचा निषेध केला. कामे न करता पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट आणि घनकचऱ्याचे बोगस बिल काढली जात आहे.

पालिकेचे कायम सफाई कर्मचारी जे आहेत ते स्वतः काम करीत नाही आणि ते रोजंदारीचे कामगारांकडून कामे करून घेतात, असे अनेक नियमबाह्य असलेले विषय पालिकेचे प्रशासक यांच्या लक्षात आणून दिले. तसेच पालिकेचे आरोग्य विभागाचे निगरगठ्ठ एएसआय व पालिकेचे विद्युत व प्रभारी पाणी पुरवठा अभियंता यांच्याविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला. शेवटी आ.शिरीष चौधरी यांनी पुढाकार घेऊन पालिकेच्या सभागृहात पालिकेच्या प्रशासक तथा प्रांताधिकारी देवयानी यादव यांच्या समवेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. एक-एक विषय घेवून चर्चा केली. यावेळी नागरिकांनी एक नव्हे अनेक नागरी समस्यांचा पाढाच वाचला तर पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट, साफसफाई व नागरिकांच्या अत्यावश्‍यक सुविधा ही कामे योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही यासाठी पालिकेचे पदाधिकारी नगरसेवक यांच्यासह नागरिकांची समिती स्थापन करून होत नसलेल्या कामांचा रिपोर्ट प्रशासक यांच्याकडे द्यावा व यात कामचुकारपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना आ. शिरिष चौधरी यांनी दिल्या. यावेळी प्रशासक तथा प्रांताधिकारी यांनी मी प्रशासक या नात्याने प्रत्येक समस्यांचे निवारण करणार आहे. तीन दिवसात समस्या मार्गी लावण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले. पालिकेचे आरोग्य निरीक्षक यांना शो कॉज नोटीस दिली असून त्यांच्यावर कारवाई सुरू झाल्याचेही प्रशासक यांनी सांगितले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, माजी उपनगराध्यक्ष कलिम खां मण्यार, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे, माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान, माजी नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, देवेंद्र साळी, अमोल निंबाळे, शमीभा पाटील, भारती पाटील यांच्यासह पत्रकारांनी चर्चेत सहभाग घेत नागरिकांच्या समस्या मांडल्या.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष रशिद तडवी, चंद्रशेखर चौधरी, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रियाज, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनवर खाटीक, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वसीम तडवी, आसिफ मॅकनिकल, दिव्यांग शहराध्यक्ष नितीन महाजन, भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष नाना मोची, भाजपा मीडिया प्रमुख भारती पाटील, विलास तळेलेसर, संजू रल, गोटू भारंबे, शेख साबीर, पीआरपी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आरिफ शेख कलिम, सादिक शेख हसन यांच्यासह शहरवासी उपस्थित होते.

पालिकेचे एएसआय, विद्युत अभियंता यांना तात्काळ निलंबित करा

शहरात बऱ्याच भागात स्ट्रीट लाईट सहा महिन्यापासून बंद आहे. नागरिकांनी तोंडी व रजिस्टरवर नोंदी करूनही स्ट्रीट लाईट लागलेले नाही. गटारी काढल्या जात नाही. शहरातील पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे. नागरिकांसह माजी नगरसेवकांनी पालिकेचे आरोग्य विभागाचे एएसआय लक्ष्मण चावरे, पालिकेचे विद्युत व प्रभारी पाणी पुरवठा अभियंता सूरज नारखेडे यांना तात्काळ निलंबित करण्याची लेखी निवेदन देवून मागणी केली आहे. निवेदनावर नागरिकांसह माजी नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here