Kanyadan Scheme : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी कन्यादान योजना ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावे

0
4

धुळे समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त संजय सैदाणे यांचे आवाहन

साईमत/धुळे/प्रतिनिधी :

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या कुटूंबातील जोडप्यांसाठी कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी प्रस्ताव ३१ ऑगस्ट, २०२५ पर्यत सादर करावे, असे आवाहन धुळे समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त संजय सैदाणे यांनी केले आहे.

मागासवर्गीय कुटूंबातील सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणाऱ्या एका जोडप्यांसाठी रूपये २० हजार (वीस हजार मात्र) इतके अर्थसहाय्य वधूचे आई-वडील किंवा पालकांच्या नावे तर स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे रक्कम ४ हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान धनादेशाद्वारे विवाहाच्या दिवशी वितरीत करण्यात येते.

अशा आहेत अटी अन्‌ शर्ती

वधु-वर महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असले पाहिजेत. नवदाम्पत्यांपैकी वराचे वय २१ व वधुचे वय १८ पेक्षा कमी असू नये. सामूहिक विवाह सोहळ्यासाठी किमान १० जोडपी असणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठीच आहे. तथापि विधवा महिलेस दुसऱ्या विवाहासाठी अनुज्ञेय राहील. स्वयंसेवी संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे स्थानिक नोंदणी अधिनियम १९६० व सार्वजनिक विश्वस्त असली पाहिजे. त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्था यांचेविरूध्द कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदविलेला किंवा अधिनियम १८५० अंतर्गत नोंदणीकृत असली पाहिजे. तसेच अर्ज सादर करतांना नोंदणी प्रभावी असावी. तसेच न्यायालयीन प्रकरण नसले पाहिजे.

सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेणाऱ्या दाम्पत्यास देण्यात येणारे अनुदान त्यांच्या प्रथम विवाहासाठीच आहे याची खातरजमा करण्यासाठी त्या गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक व शहरासाठी नगरसेवक, मुख्याधिकारी किंवा नागरी स्थानिक संस्थेने प्राधिकृत केलेले अधिकारी यापैकी दोघांचे प्रमाणपत्र आयोजकांनी प्रस्तावासोबत सादर करावे. विवाह सोहळ्यात भाग घेणाऱ्या दाम्पत्यास जात प्रमाणपत्राची पडताळणी तहसिलदार किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करणे आवश्यक राहील. सेवाभावी संस्था,यंत्रणेने सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या जोडप्यांची माहिती विहीत नमुन्यातील अर्जात आवश्यक त्या कागदपत्रांसह विवाह संपन्न होण्याच्या किमान ३० दिवस अगोदर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, धुळे या कार्यालयाकडे सादर करावी. विवाह सोहळा स्वयंसेवी संस्थांबरोबर केंद्र, राज्य शासकीय स्वायत्त संस्था, शासकीय प्राधिकरणे, सार्वजनिक प्राधिकरणे, जिल्हा परिषद यांना आयोजित करता येईल.

सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत सादर करावे

सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यास इच्छूक असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, धुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, साक्री रोड, धुळे यांचे कार्यालयाकडे संपर्क साधून कार्यालयात उपलब्ध असलेले विहीत परिशिष्ट – अ, परिशिष्ट – ब, परिशिष्ट – क, परिशिष्ट – ड प्राप्त करून घ्यावेत. आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे, असेही श्री. सैदाणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here