साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
येथील पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार सोमवारी, २२ एप्रिल रोजी खरीप नियोजन सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी तहसीलदार गिरीश वखारे होते. सभेत मुक्ताईनगर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी धिरज हिवराळे यांनी खरीप हंगाम २०२४ नियोजनाचे सादरीकरण केले.
आगामी खरीप हंगाम नियोजनाकरीता तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख यांची पूर्वतयारी तसेच खत बियाणे व कीटनाशक यांच्या पुरवठ्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली. मागीलवर्षीच्या प्रगतीबाबत व पुढील वर्षाच्या नियोजनाकरिता सभेत तहसीलदार वखारे यांनी सर्व विभाग प्रमुखांना मार्गदर्शन केले. सभेचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी फळबाग लागवड व सेंद्रिय शेती खालील क्षेत्र वाढविण्याबाबत यंत्रणांना निर्देशित केले. सभेत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सूरज जगताप यांनी उपस्थित कृषी सेवा केंद्र धारक, खत व बियाणे कंपनी प्रतिनिधी तसेच कृषी विभागाचे खते औषधे व बियाणे पुरवठ्याबाबत नियोजनाचा आढावा घेतला.
मुक्ताईनगर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदर संदीप माकोडे यांनी नाविन्यपूर्ण पिकांचा तालुक्यात प्रयोग घेण्याबाबत सूचना दिल्या. तसेच तालुक्यात कृषी उद्योजक निर्माण करण्याकरिता बचत गट व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सुचविले. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी निशा जाधव यांनी मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड वाढविण्याकरिता तसेच गांडूळ खत व नाडेप खतचा वापर वाढवून खतांचा एकंदर वापर कमी करण्याबाबत नियोजनाचा आढावा घेतला.
कार्यक्रमात तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख, बँक शाखा प्रमुख, कृषी सेवा केंद्र धारक, ठिबक विक्रेता दुकान धारक, पतसंस्था प्रतिनिधी, कृषी विमा कंपनी प्रतिनिधी, सर्व कृषी सहायक, ग्रामसेवक उपस्थित होते.