साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
श्री तीर्थक्षेत्र अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ रोजी होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त फैजपूर येथील प्रसिद्ध खंडेराववाडी देवस्थान याठिकाणी सव्वा लाख दिवे प्रज्वलित करण्याची तयारी पूर्णत्वास आली असल्याचे खंडेराव वाडीचे उत्तराधिकारी पवन कुमारदासजी महाराज यांनी सांगितले.
खंडेराववाडी देवस्थानमधील यात्रास्थळी भव्य पटांगणावर एक लाख २५ हजार दिव्यांची व्यवस्था केली आहे. या दिव्यांची मांडणी सुटसुटीत आणि प्रज्वलित करताना सर्वांना सोयीचे होईल या उद्देशाने केली आहे. सव्वा लाख दीप तथा जय श्रीराम ही भव्य अक्षरे दिव्यांनी प्रज्वलित होतील. त्याचप्रमाणे तब्बल ३५० चौकोनामध्ये ३५० दिव्यांची व्यवस्था केली आहे. यासाठी फैजपूर परिसरातील असंख्य दानशूर श्रीराम भक्तांनी योगदान दिले आहे. ‘न भूतो न भविष्यती’ असा हा अद्वितीय कार्यक्रम २२ रोजी दुपारी चार वाजता होणार असल्याचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज यांनी सांगितले. तत्पूर्वी दुपारी दोन वाजता सुंदरकांड कार्यक्रम होईल. कार्यक्रमात सर्वांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन खंडोबा देवस्थानचे उत्तराधिकारी पवनकुमार दासजी यांनी केले आहे.