गुरुंच्या सिद्धांतांना आचरणात आणणे हीच गुरूंना खरी ‘वंदना’

0
77

गुरु पौर्णिमेनिमित्त महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे प्रतिपादन

साईमत/ न्यूज नेटवर्क/ फैजपूर :

एकदंत महाराज यांनी ब्रह्म जाणणारा तो ब्रह्म आहे. गुरु हे स्वयं ब्रह्मरूप असतात. या गुरुच्या सिद्धांतांना आचरणात आणणे ही गुरूंना खरी ‘वंदना’ ठरते. परिस केवळ लोखंडाला सोनं करतो तर गुरु हे शिष्याला आपल्यासमान बनवितात इतके ते महान असतात, असे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. गुरु पौर्णिमेनिमित्त श्री सतपंथ मंदिर संस्थान येथे सकाळी महापूजेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. महापूजेनंतर निष्क्रलंक धाम वढोदा याठिकाणी गुरुवाणी सत्संग व गुरुदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रारंभी अक्षर निवासी सद्गुरू शास्त्री भक्तीकिशोरजी महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. नंतर वैदिक मंत्रोच्चारात पंडित श्रीकांतजी रत्नपारखी यांनी सपत्नीक गुरूपाद्य पूजन केले. त्यानंतर गुजरात येथून आलेल्या भाविकांनी गुरुपूजन केले.

प्रपंचात यशस्वी होण्यासाठी इतरांचा आपल्यावर असलेला विश्वास सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. भक्ती करताना संशय कुतर्क करू नये. निःसंशय आणि निरंतर धर्मसेवा, राष्ट्रसेवा केल्यास आपण आपल्या धर्मास राष्ट्रास परमोच्च शिखरावर पोहोचू शकतो. अज्ञानात व विकार वासनांमध्ये बांधलेले मन जोपर्यंत मुक्त करणार नाही, तोपर्यंत स्वतःला सिद्ध करू शकणार नाही. मग त्याशिवाय मोक्ष मुक्ती शक्य कशी होईल, असा प्रश्न विचारत सर्वांना अंतर्मुख केले. एकलव्य आणि भक्त मीराबाई यांच्या गुरु साधनेच्या दृष्टांतातून गुरुवरील भाव, अढळ श्रद्धा, निःसंशय भक्ती आणि अखंड साधना असल्यास जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये समाधानी असले पाहिजे, हे समाधानच मोक्ष असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी सांगितले.

गुरु शिष्याचे नाते सर्जनशील

परमेश्वर आपल्याला जसे आनंदाची प्राप्ती करून देत असतो. आपण त्याचा आनंदाने स्वीकार करतो. त्याचप्रकारे जीवनातील दुःख संघर्षाची स्थिती आनंदाने स्वीकारली पाहिजे. परमार्थ आणि संसाराचा बॅलन्स सांभाळावा कारण ही एक साधनाच आहे. गुरु शिष्याचे नाते हे सर्जनशील असते. त्यातून नव्याचा उदय होतो. म्हणून उत्तम शिष्य बनून आनंदाचा आणि समाधानाचे कारण बनले पाहिजे, असेही महामंडलेश्वर जनार्दन महाराजांनी सांगितले.

गुरु दर्शनासह महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित केलेल्या ‘जागर संस्कृतीचा आनंद भक्ती गीतांचा’ या कार्यक्रमातून उभारलेला निधी हा वढोदा येथील श्री विठ्ठल रखुमाई व निष्कलंक नारायण मंदिरासाठी वढोदा येथील महिला भजनी मंडळ यांना सुपूर्द करण्यात आला. पंचक्रोशीतून, गुजरात तसेच मध्य प्रदेशातून आलेल्या हजारो भाविकांनी गुरु दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here