Power Outage In Pahur And Other ; पहुरसह शेतीचा विद्युत पुरवठा खंडीत; महावितरणला निवेदन

0
3

मागणीचे निवेदन महावितरणचे सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.

साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी :  

कोणतीही पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनीतर्फे पहूर गावासह शेतीचा विद्युत पुरवठा वारंवार बंद करण्यात येत असल्यामुळे नागरिकांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने या गंभीर बाबींकडे तातडीने लक्ष देऊन पहूरकरांना सुरक्षित आणि नियमित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन महावितरणचे सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पहूर आणि आसपासच्या परिसरात पावसाळा सुरू झाल्यामुळे वीजपुरवठा वारंवार बंद होत आहे. ज्यामुळे विद्यार्थी, लहान मुले आणि वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वीज व्होल्टेज कमी जास्त होत असल्यामुळे घरातील उपकरणे अनेक वेळा खराब होऊन आर्थिक नुकसान होत आहे. वीजपुरवठा बंद करण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना किंवा प्रसिद्धी दिली जात नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवेळा तर केवळ दहा मिनिटांच्या कामासाठी तासन तास वीजपुरवठा खंडित केला जातो.

तसेच ग्रामीण रुग्णालय, सब रजिस्टर ऑफिस, पोलिस स्टेशन, बँक, या शासकीय कार्यालयाचे दैनंदिन व्यवहार ठप्प होतात. वीज नसल्यामुळे अनेक नागरिकांना या कार्यालयातून वापस जावे लागते. तसेच शेतातील पिकांना पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे, अशा काळात पाणी देण्यासाठी वीज राहत नाही. तसेच गणेशोत्सव सुरु असून व पुढे दुर्गोत्सवमध्ये वीजपुरवठा सुरळीत राहावा यासोबतच गावातील अनेक विद्युत वाहिन्यांना गार्डनिंग (तारबंदी/संरक्षण) करणे, डिस्टुबुशन बॉक्स, अजीर्ण पोल, पावसाळ्यात, वादळी वाऱ्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच कसबे पेठ गावठाण येथील लाईनमन, वायरमन यांनी दिलेल्या कार्यक्षेत्रातच रहावे, ज्यामुळे लगेच वीज पुरवठा पूर्वरत करता येईल. याअगोदरही अनेक वेळा लेखी व तोंडी सूचना आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने या गंभीर बाबींकडे तातडीने लक्ष देऊन पहूरकरांना सुरक्षित आणि नियमित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महावितरणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता सुरेश चौधरी यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. यावेळी माजी सभापती बाबुराव घोंगडे, पहूर कसबे सरपंच पती शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन लहासे, ग्रा.पं.सदस्य शिवाजी राऊत, सुभाष धनगर, सामाजिक कार्यकर्ते चेतन रोकडे, विकास उबाळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here