साईमत/ चंदीगड
हैदराबादहून चंदीगडला आलेल्या इंडिगोच्या विमानात (फ्लाईट 6E 108) मंगळवारी लँडिंगनंतर भीषण घटना घडली. विमान धावपट्टीवर टॅक्सी वेकडे जात असताना एका प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट होऊन आग लागली. यामुळे विमानाच्या केबिनमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, विमान सुरक्षितपणे उतरले होते. मात्र, टॅक्सी वेदरम्यान अचानक एका बॅगेतील पॉवर बँकने पेट घेतला आणि काही क्षणांतच धूर संपूर्ण केबिनमध्ये पसरला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच वैमानिक आणि क्रू मेंबर्सनी तात्काळ आपत्कालीन दरवाजे उघडले आणि प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.
प्रवाशांना थेट धावपट्टीवर उतरवण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये प्रवासी घाबरून विमानातून बाहेर पडताना आणि धावपट्टीवर धावताना दिसत आहेत.
या घटनेत पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
इंडिगो एअरलाइन्सने या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत तात्काळ बचावकार्य राबवण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे टर्मिनलपर्यंत पोहोचवण्यात आले.
या घटनेनंतर विमानात पॉवर बँक आणि लिथियम बॅटरीच्या वापराबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) नियमांनुसार पॉवर बँक हँड बॅगेत ठेवणे बंधनकारक असून तिच्या वापरावर काही मर्यादा आहेत.
सध्या संबंधित विमान तांत्रिक तपासणीसाठी थांबवण्यात आले असून संपूर्ण तपासानंतरच ते पुन्हा सेवेत दाखल होणार आहे.
