साईमत, नाशिक : प्रतिनिधी
महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा उपयोग केला जात आहे. दोनच दिवसांनी हे पेव्हर ब्लॉक निखळत आहेत. यामुळे वाहनधारक त्रस्त असून अपघाताची शक्यता आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याच खड्ड्यांवरून मागील महिन्यात विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहावयास मिळाली होती.पालकमंत्री दादा भुसे यांनी तत्काळ खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. मात्र, इगतपुरी येथील सिन्नर चौफुली, बोरटेंभे फाटा, पिंपरी फाटा येथे अजूनही खड्ड्यांचे साम्राज्य असून, वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने मंगळवारी महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी अक्षरश: पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात आहे. हा केवळ दिखावा असल्याची ओरड वाहनधारकांनी केली असून, टोलवसुली मात्र पठाणी शाहीने केली जात आहे. दोनच दिवसांपूर्वी बसविलेल्या पेवर ब्लॉक अक्षरशः रस्त्यापासून निखळताना दिसत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडू शकतात.दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पेव्हर ब्लॉक महामार्गावर बसवल्याप्रकरणी टीका केली होती आणि त्यानंतरही महामार्गावर पेव्हर ब्लॉक बसविणे जोरात सुरूच आहे.