डमी ग्राहकाच्या मदतीने कारवाई; मुख्य आरोपी अटकेत, पीडित महिलांची सुटका
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
शहरातील टॉवर चौक परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संयुक्त धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. एका नामांकित लॉजवर महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बेकायदेशीररीत्या वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने ही कारवाई पार पाडली. या प्रकरणात राजू मोतीराम जोशी याला अटक करण्यात आली असून, घटनास्थळावरून रोख रक्कम आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना ९ मे रोजी गुप्त बातमीदारामार्फत विश्वसनीय माहिती मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (एएचटीयू) पथकाने संयुक्तरित्या कारवाईचे नियोजन केले.
पोलिसांनी प्रथम मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर एका बनावट ग्राहकाला संबंधित लॉजवर पाठवण्यात आले. डमी ग्राहकाने पैशांची बोलणी केल्यानंतर ठरलेला इशारा पोलिसांना दिला. संकेत मिळताच दबा धरून बसलेल्या पथकाने लॉजवर अचानक छापा टाकला. या छाप्यात संबंधित ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (पिटा अॅक्ट) कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी राजू मोतीराम जोशी याला अटक करण्यात आली असून, या रॅकेटचे शहरातील आणि बाहेरील इतर भागांशी संबंध आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे. या गैरप्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचाही पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, या रॅकेटमध्ये अडकलेल्या महिलांची पोलिसांनी सुटका केली असून, त्यांचे समुपदेशन करून त्यांना सुधारगृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी मानवी तस्करी आणि महिलांच्या शोषणाविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
शहरात कुठेही अशा प्रकारचे गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी आणि एएचटीयूच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
