Combing operation : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणगावात पहाटे पोलिसांचे धडक कोम्बिंग ऑपरेशन

0
5

चोपडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन पहाटे

साईमत/धरणगाव /प्रतिनिधी :  

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शांततेत व कोणताही अनुशासनभंग न होता पार पाडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. चोपडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन पहाटे ४.३० ते ६.३० या वेळेत पार पडले.

या कारवाईत चार पोलीस अधिकारी आणि सोळा अंमलदार सहभागी झाले होते. ऑपरेशनदरम्यान धरणगाव पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील हिस्ट्रीशिटर, दोन किंवा अधिक गुन्ह्यांमध्ये नोंद असलेले आरोपी तसेच घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी संशयितांच्या घरांची अचानक तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान करतारसिंग गुरुमुखसिंग जुन्नी हा तडीपार आरोपी आढळून आला. तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १४२ अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलावून सोशल मीडियाचा गैरवापर, धमक्या किंवा कोणत्याही प्रकारे शांततेचा भंग करण्याबाबत स्पष्ट आणि कठोर सूचना देण्यात आल्या. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईतून निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here