मध्य प्रदेशातील मौगंजमध्ये दुर्घटना; वेगावर नियंत्रण सुटल्याने दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी
साईमत / मध्य प्रदेशा
मध्य प्रदेशातील मौगंज जिल्ह्यात सोशल मीडियासाठी रील बनवण्याच्या नादात झालेल्या धोकादायक प्रकारामुळे भीषण अपघात घडला आहे. नॅशनल हायवेवर वेगाने दुचाकी चालवत आणि धोकादायक स्टंट करत असताना तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील तरुणांचा वेग नियंत्रणाबाहेर गेला. रस्त्याच्या कडेला विटांनी भरलेला ट्रेलर उभा होता. वेग अधिक असल्याने दुचाकी थेट ट्रेलरला जाऊन धडकली. या अपघातात तिन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला.
याच वेळी दुसऱ्या दुचाकीवर असलेले प्रशांत द्विवेदी आणि प्रदीप द्विवेदी हे दोन भाऊदेखील त्याच ट्रेलरला धडकले. या धडकेत ते दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून रील आणि स्टंटच्या नादात होणाऱ्या धोकादायक कृत्यांबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
