साईमत, लोहारा, ता. पाचोरा : वार्ताहर
जामनेर तालुक्यातील नेरी आणि नाचणखेडा भागात गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जामनेरच्या तहसीलदारांसह कृषी अधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांसह कृषी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदन देतेवेळी नाचणखेडा येथील युवा शेतकरी अमोल चौधरी, रोहित चौधरी, भूषण चौधरी, किरण मोरे, छोटू भगत, संदीप पाटील, रमेश चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, राजेंद्र चौधरी, नेरी येथील सागर कुमावत, ऋषीकेश पाटील आदी उपस्थित होते.
तालुक्यातील नाचणखेडा आणि नेरी परिसरात खूप मोठ्या प्रमाणात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिरावून नेला आहे. ठिबक सिंचनावर कपाशीची लागवड करायची म्हटली तर एकरी ३० ते ३२ हजार रुपयापर्यंत खर्च येतो, कोरडवाहू शेतकऱ्याला १८ ते १९ हजारापर्यंत खर्च येतो. अशा परिस्थितीत नाचणखेडा आणि नेरी शिवारातील पिकांची परिस्थिती बघितली तर १०० टक्क्यापर्यंत कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. त्यामुळे तहसीलदारांसह कृषी अधिकाऱ्यांना भेटून लवकरात लवकर पंचनामा करण्यासंदर्भात निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी त्वरित पंचनामा करण्याचेही आश्वासन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिले आहे.