बुलढाणा: भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचा एका तरुणीसोबतचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या फोटोचा आधार घेत विरोधकांकडून महाजन यांना घेरण्याचा आणि त्यांची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आता स्वतः मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावत एक मोठा दावा केला आहे. ते बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“तो फोटो मॉर्फ्ड केलेला”, महाजनांचा दावा
व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण देताना गिरीश महाजन म्हणाले, “सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला संबंधित फोटो पूर्णपणे मॉर्फ (बनावट) केलेला आहे. मला माहित नाही की हे फोटो नक्की कसे मॉर्फ करण्यात आले, पण यासंदर्भात मी निश्चितपणे कायदेशीर कारवाई करणार आहे. याप्रकरणी मी उद्याच मुंबईत अधिकृत तक्रार दाखल करणार आहे.” (दरम्यान, जळगाव सायबर पोलिसांतही या बनावट फोटोप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे).
संजय राऊतांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात झालेल्या मोठ्या फुटीवर बोलताना महाजन यांनी “ठाकरे गटाचे खासदार फुटले कसे?” असा प्रश्न उपस्थित केला होता. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत गिरीश महाजनांवर हल्लाबोल करत, “माझ्याकडे फक्त एक दिवसासाठी ईडी आणि सीबीआय द्या, मी गिरीश महाजन यांना फोडून दाखवतो” अशी टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना महाजन म्हणाले, “त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार आहे. ते नेहमीच अशा पद्धतीची विधाने करत असतात, त्यामुळे मी त्यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देत नाही.”
शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्सुकता वाढली
दुसरीकडे, आज शिवसेनेचा वर्धापन दिन असून ठाकरे गटात झालेल्या मोठ्या बंडखोरीच्या आणि ६ खासदारांनी गट सोडल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या सर्व घडामोडींवर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या भाषणात नेमका कोणावर हल्लाबोल करणार? शिवसेना शिंदे गट की भाजप? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
