साईमत न्यूज नेटवर्क –
नाशिक : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या जोडीदाराचा प्रियकराच्या मदतीने काटा काढून त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकून दिल्याची धक्कादायक घटना पाथर्डीफाटा परिसरात उघडकीस आली आहे. वसंत गोरखनाथ सातपुते यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरून कसारा घाटात नेण्यात आला. या प्रकरणाचा छडा लावत गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने महिलेसह तिच्या प्रियकराला आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वसंत सातपुते हे पाथर्डीफाटा येथील साई आंगण रो-हाऊसमध्ये हसिना हबीब शेख हिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सातपुते यांना मद्यपान व जुगाराचे व्यसन असल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान, हसिना हिचे साहिल रफिक शहा याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले. या संबंधात सातपुते अडथळा ठरत असल्याने त्यांचा कायमचा अडथळा दूर करण्याचा कट रचण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
हसिना हिने प्रियकर साहिल शहा याच्यासोबत सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. या कटात साहिलचा साथीदार मोईन मुख्तार शहा आणि सरफराज अबरार सय्यद यांचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार ६ ऑगस्ट रोजी पहाटे राहत्या रो-हाऊसमध्ये सातपुते यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गळ्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली.
हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह गोणीत भरला. त्यानंतर मध्यरात्रीची वेळ साधून मृतदेह कसारा घाट परिसरात नेऊन फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे. दुसरीकडे, आपल्यावर कोणालाही संशय येऊ नये यासाठी हसिना हिने सातपुते बेपत्ता असल्याचा बनाव केला. तिने कडवे यांना दूरध्वनी करून सातपुते बेपत्ता असल्याची माहिती दिली. त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी सातपुते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.
तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. चौकशीदरम्यान हसिना हिच्या बोलण्यात तसेच देहबोलीत पोलिसांना संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. चौकशीत तिने सातपुते यांच्या हत्येच्या कटाची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी हसिना हबीब शेख, तिचा प्रियकर साहिल रफिक शहा, मोईन मुख्तार शहा आणि सरफराज अबरार सय्यद यांना अटक केली आहे. सातपुते हे यापूर्वी रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होते. अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादाचा शेवट थेट हत्येत झाल्याने या प्रकरणाने पाथर्डीफाटा परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या हत्येचा पुढील तपास सुरू आहे.
