साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथे अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी, २२ जानेवारी रोजी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते. यामुळे संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण तयार झाले होते. डीजेच्या तालावर आबाल वृद्ध मंडळी, तरुण-तरुणी, महिला वर्ग बेधुंद होऊन आनंदोत्सव साजरा करत होते. मुली आणि महिलांनी आपल्या डोक्यावर कलश घेऊन शोभायात्रेत सहभाग नोंदविला. गावातील मुलींनीही भगवे फेटे घालून हजेरी लावली. सकाळी पूर्ण गावात रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी झाली. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे लाईव्ह प्रक्षेपण गावातील महिला नागरिकांनी पाहिले. गावातील शोभायात्रा श्रीराम मंदिर येथे आल्यानंतर गावातील कारसेवक अशोक चौधरी, माधव चौधरी, रमेश लिंगायत यांचा सत्कार करण्यात आला.
गावातील रामभक्तांनी शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी जलसेवेचे नियोजन केलेले होते. प्रभू श्रीराम यांची आरतीला संपूर्ण गावातील कुटुंब उपस्थित होते. त्यामुळे हा सोहळा ‘याची देही आणि याची डोळा’ असा झाला होता. आरती झाल्यानंतर बुंदीचा प्रसाद देण्यात आला. दुपारी महिलांनी श्रीरामाच्या भजनांचे गायन केले. त्यानंतर रामराज्य फाउंडेशन, यंग स्टार क्लब यांच्यावतीने बँड व ढोल पथक गजरात श्रीराम प्रभूंचे स्वागत केले. श्रीराम, सिता, लक्ष्मण, हनुमान यांचे सजीव देखावे सादर करण्यात आले.
रात्री रामायणाचार्य ह.भ.प.अशोक महाराज कन्नडकर यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कीर्तनाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. श्रीराम मंदिराचे पुजारी ह.भ.प.रवींद्र कलाल महाराज यांनी प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा शोभायात्रा यशस्वीतेसाठी सर्वांनी अथक परिश्रम घेतले. देणगी स्वरूपात मदत करणाऱ्या सर्व रामभक्तांचे आभार मानले.