साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा आणि भडगाव तालुक्यात रविवारी, २६ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्रीपर्यंत भडगाव तालुक्यात ३५ एमएम व पाचोरा तालुक्यात २६ एमएम पाऊस झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे कापूस, तूर, मका, ज्वारी, फळपीक, भाजीपाला पिक उभे असताना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे पाचोरा-भडगाव निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी दिली. यासंदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी आपल्या खरीप हंगामातील (कापूस, तूर आदी) पिकांचा विमा उतरविलेला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ ऑनलाईन पद्धतीने किंवा स्थानिक तालुका कृषी कार्यालयात जाऊन नुकसानीची तक्रार नोंदवावी जेणेकरून पिक विमा कंपनीमार्फत पिकांचे पंचनामे करण्यात येतील. तसेच ज्या शेतकऱ्यांचा विमा नसेल असे सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून करण्याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासनास मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या असल्याची माहिती अमोल शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.