पळासखेडा मिराचे नि.प. पाटील विद्यालयात रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

0
2

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथील नि.प. पाटील विद्यालयात एसएससी १९९३ च्या बॅचचा गेट टुगेदर कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रंगल्याने माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षस्थानी हिरालाल राजपूत होते. सुरवातीला खुशी पांडे हिने ‘सत्यम शिवम सुंदरम्‌’ या गाण्याने सुरवात करून वातावरणात प्रसन्नता निर्माण केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक डब्ल्यू.एस.पाटील, एस.एस.पाटील उपस्थित होते. तसेच माजी विद्यार्थिनी यांचे पती यांना व्यासपीठावर मानाचे स्थान देण्यात आले. त्यानंतर गुरुजनांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. तसेच आलेल्या पाहुण्यांना आपल्या परंपरेनुसार रुमाल, टोपी, गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.

मेळाव्यातील सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतःचा व परिवाराचा परिचय करून दिला. ॲड.राजु मोगरे यांनी काही विद्यार्थ्यांना ग्रुपकडून मदत करावी, असे आव्हान केले. दिवाकर पाटील यांनी शाळेतील आठवणी आणि गु्रपमुळे स्वःतामध्ये काय बदल झाले ते सांगितले. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला पळासखेडा विटनेर, मोहाडी, करमाड, रोटवद, सवतखेडा, देवप्रिंप्री, नांद्रा यांच्यासह इतर गावातील माजी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.भारत कळसकर तर आभार विजय राजपूत यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here