
महोत्सवात होणार ‘पालखी’चा पाचवा प्रयोग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
पद्मविभूषण रतन टाटा यांना समर्पित असलेला ‘नाट्य रतन’ महोत्सव मुंबईमध्ये होत आहे. ‘नाट्य रतन’ तर्फे कला आणि नाट्य महोत्सवाचे आयोजन मुंबईत केले आहे. यानिमित्त संपूर्ण देशातील बारा विविध भाषिक नाटकांची महोत्सवासाठी निवड केली आहे. जळगाव सारख्या छोट्या शहरातील नाटकाची निवड राष्ट्रीय महोत्सवात होणे ही जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. चार दिवस चालणाऱ्या नाट्य महोत्सवात परिवर्तन जळगाव नाट्यसंस्थेच्या शंभू पाटील लिखित आणि दिग्दर्शित ‘पालखी’ नाटकाची निवड केली आहे.
मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील नाटके महोत्सवात सादर होणार आहेत. २५ ते २८ डिसेंबर या कालावधीत ‘नाट्य रतन’ महोत्सव यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे होणार आहे. त्यात परिवर्तन जळगावचे पालखी हे दोन अंकी मराठी नाटक २६ डिसेंबर रोजी सादर होणार आहे. पालखी नाटकाचा पाचवा प्रयोग आहे. यापूर्वी जामनेर, अमळनेर, बऱ्हाणपूर आणि जळगाव या ठिकाणी चार प्रयोग झालेले आहेत. पाचवा प्रयोग नाट्य महोत्सवात होणार आहे. मराठी संस्कृतीचा अविभाज्य अंग असलेल्या वारकरी परंपरेचा शोध घेणारे नाटक ३५ कलावंतासह रंगमंचावर सादर होत. महाराष्ट्रातील सामजिक वास्तव, मानवी समूहाच्या भावभावना, विभिन्न दृष्टिकोन या सगळ्याच दर्शन घडवत ही पालखी अनेक स्तरावर प्रेक्षकांना अंतर्मुख करते.
परिवर्तनच्या यशाबद्दल मान्यवरांकडून कौतुक
महोत्सवात जळगावच्या पालखी नाटकासोबतच मकरंद देशपांडे यांचे ‘मद्यापी’, ‘इन्स्पेक्टर पवार परत मेला’, ‘महादेव’, पुणे येथील ‘जॉयराइड’, ग्वाल्हेर येथील ‘कनुप्रिया’, ‘इथेच टाका तंबू’, ‘श्याम’, ‘पॉपकॉर्न’, लखनऊ येथील ‘आखरी वसंत’, ‘कर्ण’ आदी नाटकांची निवड केली आहे. पद्मविभूषण रतन टाटा यांना समर्पित असलेल्या ‘नाट्य रतन’ महोत्सवासाठी परिवर्तनच्या यशाबद्दल अशोक जैन, प्रा.डी.डी.बच्छाव, छबीराज राणे, अनिल कांकरिया, अनिश शहा, अमर कुकरेजा, डॉ.रेखा महाजन, नंदलाल गादीया, नंदकुमार अडवाणी, डॉ.सोनाली महाजन यांनी अभिनंदन केले आहे.


