श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराजवळ रस्ता दुभाजकाला स्वयंचलित सिग्नल बसविण्याची मागणी
साईमत/पहुर,ता. जामनेर/प्रतिनिधी
येथील ग्रामीण रुग्णालयापासून श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरापर्यंत रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहे. खड्डे चुकवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. तसेच श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर असलेले दुभाजक धोकादायक ठरत आहे. दुभाजकावर वाहने धडकल्याने वारंवार अपघात घडत आहेत. अपघात टाळण्यासाठी दुभाजकाची दुरुस्ती करून येथे स्वयंचलित सिग्नल बसविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पहुर ग्रामीण रुग्णालयापासून श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरापर्यंत रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मंजूर झाले आहे. या कामाअंतर्गंत रस्ता दुभाजक बनविण्यात आले आहेत. तथापि, रस्त्याच्या कामास अद्यापही गती आलेली नसल्याने वाहन चालकांसह स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सरकारी दवाखाना ते श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर दरम्यान आर. टी.लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गुरांचा दवाखाना, पोलीस स्टेशन, १३२ के.व्ही. महापारेषण केंद्र असे विविध शासकीय कार्यालये आहेत. मात्र, रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी कोणतेही सूचना फलक लावण्यात आलेले नाही. हा रस्ता भरवस्तीतून जात असल्याने नेहमीच पायी चालणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते.
श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराकडून पहुरकडे जात असताना महात्मा फुले तेलबिया संस्थेपासून आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत वाहनांचा वेग प्रचंड असतो. येथे वळण रस्ता असल्याने आणि कोणतेही सूचना फलक तथा गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर नाली मंजूर झाली असली तरी मात्र प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. परिणामी पावसाळ्यात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते.