साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
येथील ‘मॉर्निंग वॉक’ ग्रुपच्यावतीने विविध ठिकाणी निवड आणि पुरस्कार प्राप्त गुणवंत सदस्यांचा सत्कार सोहळा नुकताच सारोळा शिवारातील भोला आप्पा चौधरी यांच्या फार्म हाऊसच्या प्रांगणात पार पडला. अध्यक्षस्थानी योगशिक्षक सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार अशोक पाटील होते. याप्रसंगी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळू पाटील, ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सेवानिवृत्त नायब तहसीलदार सतीश चौधरी, बापू बडगुजर, प्रा.सी.एन.चौधरी, प्रा.डी.पी.वाणी, सहाय्यक फौजदार भगवान बडगुजर, शशिकांत पाटील, विजय पाटील, माजी सैनिक किशोर पाटील, मंडळ अधिकारी विजय येवले, पीपल्स बँकेचे निवृत्त कॅशियर आर.आर.वाणी, अशोक पाटील, ग.स.सोसायटीचे निवृत्त अधिकारी चंद्रकांत शेलार, प्राचार्य संजय पाटील, सेवानिवृत्त तलाठी गायकवाड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पीटीसी संस्थेचे संचालक व कुऱ्हाड (ता.पाचोरा) येथील आदर्श विद्यालयाच्या शालेय समिती चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सतीश चौधरी, नाशिक येथील श्री कालिका देवी मंदिर संस्थांनच्या कै.कृष्णराव कोठावळे उत्तर महाराष्ट्र स्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त प्रा.सी.एन.चौधरी, केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्यावतीने दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या संचालनासाठी विशेष शेतकरी अतिथी म्हणून आमंत्रित केलेल्या बापू बडगुजर, चारधाम यात्रा पूर्ण करणाऱ्या विजय येवले आणि आर.आर.वाणी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बाळू पाटील, सतीश चौधरी, प्रा.सी.एन.चौधरी, अशोक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. भोला अप्पा चौधरी फार्म हाऊस मित्र मंडळाच्यावतीनेही बाळू बडगुजर, प्रा.सी.एन.चौधरी, आर.आर.वाणी, विजय येवले यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त चारधाम यात्रा पूर्ण करणाऱ्या प्रा.सी.एन.चौधरी, विजय येवले, आर.आर.वाणी यांच्यावतीने ‘मॉर्निंग वॉक’ गु्रपच्या सर्व सदस्यांना कुटुंबीयांसह वनभोजन देण्यात आले. तसेच महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त उखाण्यांचा कार्यक्रम चांगलाच रंगला. प्रास्ताविक प्रा.सी.एन.चौधरी, सूत्रसंचालन प्रा.डी.पी.वाणी तर संजय पाटील यांनी आभार मानले.