साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाचा बारावी कला विभागाचा निकाल ९८ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालाची यशस्वी परंपरा कायम राखत विद्यार्थिनींच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यात यश मिळविल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे कौतुक होत आहे. निकालात साक्षी सचिन देशमुख ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
विश्वासराव पवार ट्रस्ट नगरदेवळा संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय पाचोरा येथील कला शाखेतून ८३ विद्यार्थिनी बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी ८१ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण विद्यार्थिनींमधून तीन विद्यार्थिनींनी गुणवत्ता प्राप्तांक प्राप्त केले आहे. ४३ विद्यार्थिनींना प्रथम श्रेणी तर ३५ विद्यार्थिनींना द्वितीय श्रेणी प्राप्त झाली आहे.
पाचोरा कन्या विद्यालयातील प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी व कंसात त्यांना मिळालेले गुण असे-साक्षी सचिन देशमुख (७९.१७), किरण वामन पाटील (७७.३३), रुपाली साहेबराव चंदाने (७३.६७), निशा रवींद्र पाटील (७१.५०), आरती सर्जेराव मोरे (७१ टक्के).
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विश्वासराव पवार ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशील राजे पवार, सचिव श्रीमती रूपाली जाधव तसेच संचालक मंडळ, प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.