कामगारांचे शिष्टमंडळ उद्या सहकार आयुक्तांना भेटणार
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी
यावल तालुक्यातील न्हावी येथील मधुकर सहकारी कारखान्यातील कामगारांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी संघर्षाचा पावित्रा घेतला आहे. कारखान्यातील कामगारांचे शिष्टमंडळ राज्याचे साखर आयुक्त यांची भेट घेण्यासाठी उद्या पुण्याला जात आहेत. तेथे काय चर्चा होते. त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असे मधुकरच्या राष्ट्रीय कामगार संघटनेचे सचिव सुनील कोलते यांनी दै. ‘साईमत’ला सांगितले.
श्री.कोलते यांनी सांगितले की, मधुकर साखर कारखाना घाईघाईत विकला गेला असून त्यामुळे एक हजार २०० कामगार देशोधडीला लागले आहे. कामगारांची घामाची देणी देण्यापूर्वीच कारखाना विकून टाकला गेला. कामगारांचे तीन वर्षांचे वेतन थकलेले असून वेतनासह भविष्य निर्वाह निधी व इतर अशी ५२ कोटींची रक्कम कामगारांची थकली आहे. कारखाना खासगी कंपनीला विकला गेल्यामुळे कामगारांचा रोजगार तर गेलाच पण हक्काचे थकीत पेमेंट ही अद्याप मिळालेले नाही. कारखान्याच्या कामगारांचे अतोनात हाल होत असून कोणताही राजकीय पक्ष किंवा पुढारी आमच्या या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहत नसल्यामुळे प्रचंड अस्वस्था कामगार वर्ग आणि त्यांच्या कुटुंबियात पसरली आहे. कामगारांच्या सहनशिलतेची आता मर्यादा झाली असून आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे मधुकरच्या कामगार संघटनेने लोकशाही मार्गाने संघर्षाचा पावित्र्याचा निर्णय घेतला आहे.
संघटनेचे शिष्टमंडळ उद्या पुण्याकडे निघत असून तेथे आमची कैफियत राज्याच्या साखर आयुक्तांपुढे मांडण्यात येईल. त्यांनी काही सन्माननिय तोडगा काढला नाही, तर मग आम्हाला आंदोलन हाच पर्याय आहे. आमच्या संघटनेत ५० ते ६० वयापुढचे कामगार असून त्यांना थकीत वेतनाची खूप गरज आहे. आमच्या थकीत वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतीही राजकीय व्यक्ती पुढे आलेली नाही, अशी खंत व्यक्त करुन कोलते म्हणाले की, आपल्या हक्कासाठी आता आम्हाला संघर्ष करणे भाग पडणार आहे.
जिल्हा बँकेनेही जबाबदारी झटकली वास्तविक कारखाना विक्री करण्यापूर्वी कामगारांची सर्वच देणी अदा करण्याविषयी बँकेल विनंती केली होती. बँकेनेही त्याबाबत अनुकुलता दर्शविणारी तथापि, कारखाना विक्री करुन बँकेने आपला कर्जाची येणी वसूल केली व कामगारांना वाऱ्यावर सोडून दिले.