धुळे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी आक्रोश आंदोलन

0
11

साईमत, धुळे : प्रतिनिधी

पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने धुळे तालुक्यासह जिल्ह्यात पिकांची अवस्था बिकट आहे. खरिपाचे उत्पादन ३० टक्केही येणार नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काँग्रेसने शहरात शेतकरी आक्रोश आंदोलन केले. तसेच प्रदेश कार्याध्यक्ष तथा आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम दोन दिवसात न मिळाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनांतर्गत जेल रस्त्यावर सकाळी दीड तास धरणे आंदोलन झाले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष डॉ. अनिल भामरे, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, माजी सभापती गुलाबराव कोतेकर, पंचायत समितीची माजी सभापती भगवान गर्दे, लहू पाटील, बाजार समितीचे संचालक साहेबराव खैरनार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, शहराध्यक्षा बाणूबाई शिरसाठ आदी सहभागी झाले होते.

आंदोलनात दुष्काळ जाहीर न करणाऱ्या भाजप-शिंदे सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची भेट घेतली. त्यांना अकरा मागण्यांचे निवेदन दिले. दुष्काळ जाहीर करावा, भारनियमन थांबवावे, पीक विम्याच्या रकमेचे अग्रीम देण्याचे आदेश अन्य जिल्ह्यात झाले आहे. तसेच आदेश धुळ्यासाठी द्यावे, अशी मागणी झाली.

शैक्षणिक शुल्क माफ करावे

दुष्काळ जाहीर होत नसल्याने केंद्र व राज्य सरकारचा निषेध झाला. मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी विविध घोषणांचे फलक हातात धरले होते. कृषीपंपाचे वीजबिल व शैक्षणिक शुल्क माफ करावे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, चारा छावण्यांसह रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी, शेतसारा माफ करावा, वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आंदोलनात करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here