साईमत जळगाव प्रतिनिधी
पावसाच्या सरींच्या वर्षावातही भाविकांचा ओसांडून वाहणारा उत्साह आणि ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ या जयघोषासह टाळ, चिपळ्यांचा निनादाने गुरुवारी (दि. 29) साजरा झालेल्या रथोत्सवामुळे अवघी पिंप्राळानगरी दुमदुमून गेली होती. आषाढी एकादशीनिमित्त पिंप्राळ्यातील विठ्ठल मंदिर संस्थान आणि वाणी पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
जळगाव शहरात गुरुवारी आषाढी एकादशीनिमित्त विविध संस्था, शाळा, महाविद्यालयांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पिंप्राळा नगरीत विठ्ठल मंदिर संस्थानच्या 148 वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी ‘माऊली..माऊली’ चा जयघोष ऐकायला येत होता. शाळा-महाविद्यालय व विविध संस्थांकडून दिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते.
पिंप्राळा येथे सकाळपासूनच रथोत्सवाचा उत्साह होता. पहाटेपासून विधिवत रथाची व मूर्तीची तयारी सुरू होती. सकाळीच पावसाला सुरुवात झाल्यावरही भाविकांचा उत्साह कायम होता. दुपारी 1 वाजता सजविलेल्या रथातील मूर्तीची आरती करण्यात आली. महाआरतीसाठी माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, आबा कापसे, मयूर कापसे, अमर जैन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, माजी पोलीस पाटील विष्णू पाटील, संस्थानाचे अध्यक्ष मोहनदास वाणी, पंढरीनाथ वाणी, योगेश वाणी, संजय वाणी यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. आरती झाल्यानंतर मान्यवरांसह भाविकांच्या हस्ते रथ ओढून रथोत्सवास सुरुवात झाली. या वेळी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’चा जयघोषाने अवघा परिसर दुमदुमला होता.
स्वागतासाठी पावसाचीही हजेरी
दरवर्षी आषाढी एकादशीला रथोत्सवात पाऊस पडतो. गुरुवारीही वरुणराजाने ही परंपरा कायम राखली. रथोत्सवाच्या स्वागतासाठी महापूजेआधीच पावसाने सकाळी 11 वाजेला जोरदार हजेरी लावल्याने भाविकांचा आनंद द्विगुणित झाला होता. पिंप्राळ्यातील चावडीपासून रथोत्सवाला सुरुवात झाली. घराघरांतून गृहिणी रथाची आरती करीत होत्या. पंचक्रोशीतील पांडुरंग भजनी मंडळ, विणकर भजनी मंडळाच्या टाळकऱ्यांनी रथाच्या पुढे अभंग म्हटल्याने वातावरण भक्तिमय झाले होते.
दुपारी 12 वाजेच्या सुमारास सारथी अर्जुन, हनुमान, गरुड मूर्ती व त्यापुढे घोडे आरुढ होऊन रथ सुशोभीत करण्यात आला होता. तसेच रथासमोर पुढे पांडुरंग भजनी मंडळ, पालखीच्या सोहळ्यात टाळ मृदंगाच्या गजरात भजन, गवळणी, अभंग, गाण्यात मन होऊन पंढरपूरचे वातावरण निर्माण झाले होते. रथापुढे पालखी, भजनी मंडळ, दिंडी, भगवे झेंडे, गुरव मंगल वाद्य, लेझीम, भवानी देवीची सोंग हे भविकांचे आकर्षण ठरली होती.
रथ मार्गावर मोफत फराळाचे वाटप
श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची अलोट गर्दी, रथोत्सव मार्गावर आयोजक व भविकांच्या स्वागतासाठी फराळ, केळी, चहापाणी व पिण्याचे पाण्याची मोफत सेवा विविध सेवाभावी मंडळांतर्फे तसेच येथील रहिवाशांनी केली होती.
या मिरवणुकीत प्रथम अश्व, भजनी मंडळ, सोंग, लेझीम पथक अशी रचना करण्यात आली होती. या मिरवणुकीत बालकांनी सुंदर असा छोटा रथ सजवून सहभाग घेतला होता. या छोट्या रथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. रथोत्सवात आबालवृद्धांनी गर्दीत सहभाग घेतला होता. रथाच्या मार्गात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.