कांदा निर्यात शुल्क 1 एप्रिलपासून रद्द
जळगाव (प्रतिनिधी)-
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क 1 एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कांद्याचे दर स्थिर राखण्यासाठी मध्यंतरी केंद्राने हे शुल्क लागू केले होते.. मात्र, यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, केंद्र सरकारचा हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. कांदा निर्यातीवर आकारण्यात येणारा वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा प्रश्न सुटावा यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधून त्यांना लक्ष घालण्याची विनंती केली होती. भविष्यातही शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील.” असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले आहे.