साईमत, धुळे । प्रतिनिधी
गोवर रुबेला आजाराच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकारने विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. तीन फेऱ्यात होणाऱ्या मोहिमेचा सोमवारी, ७ ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला आहे. मोहिमेत लसीकरणापासून वंचित व अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
धुळे महानगरपालिका क्षेत्राचा विचार करता तब्बल एक हजार ४७१ लाभार्थी लसीकरणापासून वंचित अथवा त्यांचे अर्धवट लसीकरण असल्याचे समोर आले आहे. त्यातील बहुतांश लाभार्थी अल्पसंख्याक भागातील असल्याचे सांगितले जाते. या लाभार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याचे आव्हान महानगरपालिकेच्या यंत्रणेपुढे आहे. शून्य ते पाच वर्षे वयोगटाच्या बालकांसह गर्भवती मातांचे विविध आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना विविध लशी दिल्या जातात. खासगी तसेच शासकीय दवाखान्यांमध्ये या लशी उपलब्ध असतात. शासकीय दवाखान्यात या लशी मोफत उपलब्ध असतात, शिवाय शासकीय दवाखान्यात चांगल्या दर्जाच्या लशी उपलब्ध असतात, असा लोकांमध्ये विश्वास असल्याने अगदी श्रीमंतापासून गरिबापर्यंत सर्वच नागरिक आपापल्या बालकांना शासकीय, महापालिका दवाखान्यात लसीकरणासाठी आणतात असे चित्र दिसते.
धुळे महानगरपालिकेच्या दवाखान्यातही नेहमी लसीकरणासाठी रांगा पहायला मिळतात. असे असले तरी काही लाभार्थी या लशी घेण्यात कुचराई करताना दिसून येतात. अनेक जण निश्चित केलेल्या सर्व लशी पूर्ण करत नाहीत अर्थात अर्धवट लशी घेतलेलेही अनेक लाभार्थी असतात. लशीपासून वंचित अथवा अर्धवट लसीकरणामुळे त्या-त्या आजारांच्या उच्चाटनाच्या कामात अडथळे निर्माण होतात. आता केंद्र सरकारने डिसेंबर-२०२३ पर्यंत गोवर रुबेला आजाराच्या उच्चाटनासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर अशा तीन फेऱ्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
