कवडीबागेत काळजाचा ठोका चुकवणारी घटना;मुसळधार पावसात घराचा आधारच ढासळला
साईमत /वसई/ प्रतिनिधी :
वसई-विरार शहरात मंगळवारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच वसई पश्चिमेतील रमेदी-कवडीबाग परिसरात जुने कौलारू लाकडी घर अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. शशिकला अरुण पाटील असे मृत वृद्धेचे नाव आहे. घराच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या शशिकला पाटील यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढले; मात्र गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
मंगळवारी वसई-विरार शहरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला होता. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले होते. त्याचदरम्यान सकाळी साडेअकराच्या सुमारास रमेदी येथील कवडीबाग परिसरात शशिकला पाटील यांचे जुने कौलारू लाकडी घर अचानक कोसळले. घराचा मोठा भाग कोसळल्याने त्या ढिगाऱ्याखाली अडकल्या.
घर कोसळल्याची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या तामतलाव विभागातील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घराचा ढिगारा हटविण्यासाठी जवानांनी वुडकटर मशीन तसेच लोखंडी पहारीच्या साहाय्याने बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली वृद्ध महिला अडकून पडल्याने बचावकार्य अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आले. जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर शशिकला पाटील यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आले.
घर कोसळल्यामुळे शशिकला पाटील गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी पालिकेच्या सर डी. एम. पेटिट रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची वसई पोलीस ठाण्यात अपमृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, वसई-विरार परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जुनी व धोकादायक घरे, जीर्ण बांधकामे तसेच कमकुवत झालेली झाडे कोसळण्याचा धोका वाढला आहे. रमेदी येथील दुर्घटनेमुळे धोकादायक वास्तूंचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यापूर्वी अशा धोकादायक घरांची पाहणी करून संबंधित रहिवाशांना योग्य त्या सूचना देण्याची तसेच आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक आणि जीर्ण घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिका प्रशासनाने अशा वास्तूंचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींवर वेळीच कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या दुर्घटनेमुळे वसई परिसरात अतिवृष्टी आणि पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये दगावलेल्यांची संख्या १२ वर पोहोचली आहे. त्यामुळे पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासोबतच धोकादायक बांधकामांबाबत प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
