साईमत प्रतिनिधी
दुपारी उसळला वाद, हिंसक हाणामारीत रुपांतर
जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी गावात रविवारी दुपारी जुन्या वैरातून दोन कुटुंबांमध्ये भीषण हाणामारी झाली. यात एकनाथ निंबा गोपाळ (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला असून एकूण ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून सर्वांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
दशकभर जुना वाद पुन्हा पेटला
गोपाळ आणि पाटील कुटुंबांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून वाद सुरू आहे. शनिवारी रात्री गोपाळ कुटुंबातील एका व्यक्तीची दुचाकी पाटील कुटुंबातील तरुणांनी अडवल्याने शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळी वातावरण तापले असले तरी ग्रामस्थांच्या हस्तक्षेपाने वाद थांबला. परंतु दुसऱ्या दिवशी हा वाद पुन्हा पेटला आणि जीवघेण्या हाणामारीत परिवर्तित झाला.
ग्रामपंचायत बांधकामस्थळी रक्तरंजित संघर्ष
रविवारी दुपारी एकनाथ गोपाळ आणि त्यांच्या कुटुंबीय ग्रामपंचायतीच्या बांधकामस्थळी काम करत असताना पाटील कुटुंबातील सदस्य तेथे पोहोचले. पुन्हा वाद सुरू झाला आणि संतापाच्या भरात दगड, पावडी, लाकडी दांडके यांचा वापर करून हाणामारी झाली. यात गंभीर जखमी झालेल्या एकनाथ गोपाळ यांनी घटनास्थळीच प्राण गमावले.
जखमींची यादी
या संघर्षात पाटील कुटुंबातील किरण देविदास पाटील (२८), मिराबाई सुभाष पाटील (४५), ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील (४०), दीपक ज्ञानेश्वर पाटील (२३), संगीता रोहिदास पाटील (४०) हे जखमी झाले आहेत. तर गोपाळ कुटुंबातील जनाबाई एकनाथ गोपाळ (५५), एकनाथ बिलाल गोपाळ (३५), गणेश एकनाथ गोपाळ (२३), भीमराव एकनाथ गोपाळ आणि कमलेश प्रमोद पाटील (२६) यांनाही गंभीर दुखापती झाल्या आहेत.
संतप्त नातेवाईकांचा आक्रोश
घटनेनंतर गोपाळ कुटुंबीय आणि नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत दोषींवर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली. “जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
गावातील तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
            


