जुनी पेन्शन योजनेसह अन्य मागण्या मंजूर न झाल्यास मूलभूत सेवा बंद करण्याचा इशारा
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय विविध संघटनामार्फत जुनी पेंशन योजना लागू करणेसाठी गुरुवारी, २९ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगरपरिषद, नगरपंचायतीमधील २००५ नंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी केली नसून जुनी पेंशन योजना बंद केली आहे. त्यामुळे राज्य संवर्गातील जवळपास तीन हजार अधिकारी आणि स्थानिक आस्थापनेवरील साठ हजाराच्यावर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे पाचोरा नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे. जुनी पेन्शन योजनेसह अन्य प्रमुख मागण्या मंजूर न झाल्यास मूलभूत सेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे.
संघटनेमार्फत शासन, नगरविकास विभाग, नगरपरिषद प्रशासन संचालनालयास वेळोवेळी निवेदने सादर करण्यात आली. पंरतु समस्या व मागण्यांबाबत शासनामार्फत दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात नगरपरिषद संवर्ग अधिकारी यांनी संपात सहभागी होण्याबाबतचे निवेदन नगरपरिषद कार्यालयाकडे दिलेले आहे. नागरिकांना पाणीपुरवठा, विद्युत, आरोग्य, अग्निशमन, स्वच्छता अशा विविध सेवा सुविधा पुरविणे नगरपरिषदेची जबाबदारी आहे.
नगरपरिषद कार्यालयीन कामकाज पूर्णपणे बंदचे आवाहन
संपात नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत. शहरातील नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सोयी सुविधांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. मागण्या मान्य न झाल्यास सेवा टप्प्या- टप्प्याने बंद करण्यात येतील, असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. नगरपरिषद कार्यालयीन कामकाज पूर्णपणे बंद असल्याचे आवाहन केले आहे.