साईमत लाईव्ह निंभोरा ता. रावेर प्रतिनिधी
निंभोरा पोलिस ठाण्यांतर्गत २९ गावांचा समावेश आहे. या परिसरात अवैध दारुविक्री व वाहतूक, मटका, गांजाविक्री, जुगार, अवैध वाळूवाहतुक व इतर अवैध धंदे पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत खुलेआम पोलिसांच्या नजरेखाली सुरु आहेत. या अवैध धंद्यांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश लावणार, की सुरु ठेवणार? किंवा यापैकी कोणते धोरण अवलंबितात याकडे सर्व नागरीकांचे लक्ष लागले आहे.
घाम न गाळता सर्वांना हवाय मेवा
सध्या निंभोरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही परिस्थिती अनेकांचे संसार उधवस्त करीत आहेत. परंतू ‘घाम न गाळता सर्वांना हवाय मेवा’. यामुळे तरुण पिढी या अवैध धंद्यात गुंतली असून मटका, जुगार, दारु, गांजासारख्या अंमली पदार्थांचे व्यसन तरुण, वयोवृद्धांसह लहान लहान मुलांना लागले आहे. अगदी व्यसनाकरीता ते काहीही करायला तयार होतात. यामुळे ते स्वत: व आपल्या कुटुंबाला संकटाच्या दारात उभे करीत आहेत.
अवैध धंद्यांवर कारवाई होणार की सुरूच राहणार ?
अनेक शेत जुगारांचे मोठमोठे अड्डे बनलेले आहेत. पोलिसांनी जर मनावर घेतले की अवैध धंदे कुणी करणार नाही , तर परिसरात एकही अवैध धंदे करणारा आढळून येणार नाही. निंभोरा पोलिस ठाण्याचे गणेश धुमाळ हे परीसरातील सुरु असलेले अवैध धंदे सुरु ठेवणार की यावर कारवाही करणार किंवा यापैकी कोणते धोरण अवलंबिणार, हा प्रश्न पुढील काळात दिसून येईल.
पैसे मिळविण्याच्या हव्यासात पूर्ण नुकसान
मटक्यात ओपन व क्लोज याप्रमाणे आकडे लावले जातात. ओपनमध्ये आकडा लागला तर लालसेपोटी आलेले पैसे परत क्लोज आकड्यात लावले जातात. परंतु, क्लोजमध्ये आकडा न लागल्याने मिळालेल्या रकमेलाही मुकावे लागते. तसेच व्यसनाधीनता वाढते. कमी अवधीत जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासात पूर्ण नुकसान होत आहे. त्यामुळे मटका बंद करावा, अशी मागणी नागरिक करत आहे.
एक तासाचे स्टिंग ऑपरेशन
निंभोरा पोलिस ठाण्यांतर्गत २९ गावांचा समावेश आहे. या गावात सुरु असलेल्या अवैध धंद्यांचे जवळपास एका तासाचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले आहे. यात अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. यातील व्हिडीओ बघितले तर निंभोरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंद्यांना अधिकृत परवानगी आहे का?, असा प्रश्न पडतो.
विवरे येथे बनावट देशी दारूची सर्रास विक्री !
निभोरा परिसरातील विवरे येथे बनावट देशी दारूची सर्रास विक्री सुरु आहे, अगदी बेकायदेशीरपणे दारु पाजणाऱ्या अड्ड्यांची संख्या देशी दारूच्या दुकानांपेक्षा खूप अधिक आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विवरे येथे बनावट देशी दारूची सर्रास विक्रीच्या मागे मोठे रॅकेट असून विवऱ्यातील देशी दारूचे दुकान मध्य रात्रीपर्यंत सुरु राहते. तर येथूनच परिसरातील गावांमध्ये देशी दारू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी जाते. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असून यातील एक मोठा हिस्सा पोलिसांना दिली जात असल्याचा आरोप आहे.