धरणगावातील महिलांचा गढूळ पाणी प्रश्नी नगरपरिषदेवर ‘एल्गार’
साईमत/न्यूज नेटवर्क/धरणगाव :
पावसाळा सुरू झाल्यापासून गेल्या अनेक दिवसांपासून नळाला गढूळ पाणी येत आहे. अशा पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्यावे लागत आहे. दुसरीकडे वितरण व्यवस्थेतील दोषामुळे अनेक भागात पाणी पोहचतच नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शहरवासीयांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षितपणाबाबत संतापलेल्या नागरिकांनी मातीमिश्रित, चिखलयुक्त पिवळसर गढूळ पाण्याच्या बॉटल सोबत घेत नगरपरिषदेवर मोर्चा काढून प्रशासनाच्या कारभाराबद्दल रोष व्यक्त केला. शहरातील विविध पक्षांकडून, नागरिकांनी वारंवार तक्रारी करुनही पाणीप्रश्न तडीस जात नसल्याने संतप्त महिलांसह नागरिकांनी एल्गार पुकारुन नगरपरिषदेवर धडक दिली.
नगरपालिकेवर मोर्चा धडकल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत महिलांनी गढूळ पाण्याच्या बॉटल पाणी पुरवठा अभियंता व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दाखवत ‘पाणी आपण पिऊन दाखवा लाखाचे बक्षीस देवू’ अशी ऑफर देत जाब विचारला. शहराला सुरळीत पाणीपुरवठा केला पाहिजे, अशी एकमुखी मागणी आक्रमक मोर्चेकरी महिला, पुरुष व आबालवृद्धांनी केली.
लवकरच निवारण करण्याचे मिळाले आश्वासन
यावेळी कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी, पाणी पुरवठा अभियंता अनुराधा चव्हाण, कर निरीक्षक प्रणव पाटील यांनी मोर्चेकरांच्या समस्या जाणून घेत लवकरच निवारण करण्याचे आश्वासन दिले. पाणी पुरवठा अभियंता सौ.चव्हाण यांनी दूषित व गढूळ पाणी आलेल्या प्रभागात जाऊन चौकशी केली. तेव्हा शहरात नवीन पाइपलाइनचे काम सुरू असल्याने तांत्रिक अडचणी आल्याचे सांगितले.