साईमत, पारोळा : प्रतिनिधी
नगरपालिकेने शहरवासीयांचे आरोग्य, स्वच्छता, रस्ते व पाणीपुरवठा या विषयांवर सर्वोच्च प्राधान्य द्यावे. यासाठी मुख्याधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. पारोळा नगरपालिकेच्या सभागृहात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, प्रशासक तथा प्रभारी मुख्याधिकारी रवींद्र लांडे, तहसीलदार डॉ.उल्हास देवरे आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नगरपरिषदेमध्ये प्रभागनिहाय बैठका लावण्यात याव्यात असे नमूद करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, अमृत आवास २.० मध्ये झोकून देऊन काम करावे. दिवाळीच्या काळात जास्तीत जास्त वसूली करण्यात यावी. दिव्यांग व मागासवर्गीय खर्च वाढविण्यात यावा. घनकचरा व्यवस्थापन काय केले. ओला व सुका कचरा विलीनीकरण करण्यात यावे. कचरामुक्त गाव संकल्पना राबविण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे. ओला-सुका कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. शहरातील स्वच्छतेसाठी लोक सहभाग वाढविण्यात यावा.
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पारोळा नगरपालिकेने भाग घ्यावा, मुख्य बाजारपेठेत महिलांसाठी शौचालय करावेत, पाऊस थांबल्यावर खड्डे बुजविण्याचे काम करण्यात यावे, नगरपालिका स्वनिधी मधून खड्डे बुजविण्यात यावे, कर वसूली ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
बाहेर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, पारोळा नगरपालिकेने देशपातळीवर आपली ओळख निर्माण करावी, निकृष्ट कामांचे त्रयस्थ पक्षाकडून ऑडिट करून घ्यावे, शहराच्या पाणीपुरवठा लिकेज शोधून काढावा, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या मुख्य लाईनवरील अवैध कनेक्शन तोडण्यात यावे, जास्तीत जास्त वेळ फिल्डवर जाऊन काम करा, हद्दवाढीचा प्रस्ताव प्रलंबित त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. कचराकुंडी बाहेर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या.