बारामती : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार हे बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे चित्र बघायला मिळाले. दादा तुम्ही राजकारणात सक्रिय व्हा, संघटना काय असते ते दाखवून देऊ, असे कार्यकर्त्यांनी त्यांना आवाहन केले. बारामतीमधील शारदा प्रांगण येथे अजित पवार यांची जाहीर सभा झाली. त्याचबरोबर असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचे बारामतीत स्वागत केले. बारामतीमध्ये अजित पवारांचा रोड शो देखील झाला होता. या रोड शोच देखील जय पवार यांनी तोंडभरून कौतुक केले. अवघ्या बारामतीकरांचे त्यांनी आभार मानले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थ पवार आणि जय पवार हे पुत्र आहेत. २०१९च्या लोकसभेवेळी मावळमधून पार्थ पवार यांना राजकारणात उतरवण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला परंतु मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. पार्थ पवार त्यानंतर फारसे राजकारणात सक्रिय दिसले नाहीत परंतु, दोन दिवसांपूर्वी बारामतीमध्ये झालेल्या रोड शो दरम्यान आणि सभेत पार्थ पवार ऍक्टिव्ह दिसले.सभेला येऊ न शकलेले जय पवार बारामतीमध्ये आले.त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन रोड शो आणि अजित पवार यांचे केलेले स्वागत यामुळे त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले.
यावेळी जय पवार यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता. तुम्ही बारामतीची सूत्र हातात घ्या.अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे,असे म्हणत त्यांनी जय पवार यांना बारामतीच्या राजकारणात सक्रिय होण्याचे आवाहन केले. जय पवार यांनी देखील कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तुम्ही अजितदादांशी बोलून घ्या, त्यांनी मला ग्रीन सिग्नल दिला की मी लगेच तयारीला लागतो, असे जय पवार यांनी म्हटले. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या सोबतीला पार्थ पवार आणि जय पवार दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.