आता धनगरांनाही ५० दिवसांचा वायदा

0
4

अहमदनगर : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण मंगळवारी २१ व्या दिवशी मागे घेण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या शिष्टाईला यश आले आहे. काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपोषणकर्त्यांशी फोनवरून संवाद साधला होता. उपोषणकर्त्यांनी राज्यसरकारला आता ठोस निर्णयासाठी ५० दिवसांची मुदत दिली आहे. मराठा आरक्षणासाठीच्या ४० दिवसांच्या मुदतीसारखीच धनगर उपोषणकर्त्यांपुढेही वेळ देण्याचा आग्रह राज्यसरकारने धरला होता.
अहमदनगरमधील चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने उपोषण सुरू होते. धनगर समाजाला अनुसूचित जमातीतील (एसटी प्रवर्ग) आरक्षण अंमलबजावणीसाठी आंदोलन केले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मागणी सातत्याने सकल धनगर समाजाच्या वतीने केली जात आहे. दरम्यान, सरकारच्या वतीने सातत्याने उपोषण कर्त्यांशी संवाद साधला जात होता. मात्र,उपोषण कर्त्यांकडून त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी सरकार धनगर आरक्षणाविषयी सकारात्मक आहे. त्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री गिरीश महाजनांनी चौंडीतील आंदोलनाला वारंवार भेटी दिल्या आहेत. त्यांनी रुग्णालयात जाऊन उपोषणकर्त्यांची भेटीही घेतल्या आहेत. मात्र, मार्ग निघत नसल्याने हे आंदोलन सुरूच होते. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली होती. धनगर समाजाला एस.टी. आरक्षणासाठी आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी सरकार विविध पातळीवर प्रयत्न करत असल्याचे महाजनांनी सांगितले. समाजाने उपोषण आंदोलन मागे घेत सरकारला वेळ द्यावा. ठरलेल्या वेळेत सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी दिला.

मंत्री महाजन काय म्हणाले..
आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येईल. तसेच ५० दिवसांत आरक्षणाबाबतची तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये माहिती जमवण्यासह कायदेशीर मार्गाबाबत चर्चा होणार आहे. धनगर समाजासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी होती. ती देखील पूर्ण करण्यात येणार असून योजना लागू करण्यात येणार आहे.

चार दिवसांपुर्वी सह्याद्री
अतिथीगृहावर बैठक
धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याप्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे चार दिवसांपूर्वी बैठकी देखील पार पडली होती. धनगर समाजाच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील आहे. राज्य सरकार आरक्षणासह सर्व मागण्यांवर सकारात्मक आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here