कृषिमंत्री कोकाटेंसह 4 आमदार, खासदारांना नोटीस
नाशिक ( प्रतिनिधी)-
जिल्हा बँकेच्या कोट्यवधींच्या कर्ज वाटपातील अनियमिततेमुळे २५ माजी संचालक आणि त्यांच्या वारसांवर निश्चित केलेल्या जबाबदारीच्या मुद्द्यावर सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. यात कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यासह चार आमदार आणि खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचाही समावेश आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकऱ्यांना कर्ज वाटप वा ठेवीदारांना पैसे परत करण्यात सध्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बँकेवर परवाना रद्द होण्याची टांगती तलवार आहे. तत्कालीन विभागीय सहनिबंधक गौतम बलसाने यांनी बँकेच्या कर्ज वितरणाची चौकशी केली होती. त्यात २९ आजी-माजी संचालक आणि १५ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवत ४४ जणांवर १८२ कोटींची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. वसुलीसाठी नोटीसा बजावल्या गेल्या. अपिलात सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिल्यामुळे ही प्रक्रिया थंडावली.
आता संबंधितांच्या अपिल अर्जावर २ एप्रिलरोजी दुपारी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. जबाबदारी निश्चित झालेल्यांमध्ये कृषिमंत्री ॲड. कोकाटे (१.८७ कोटी), आमदार दिलीप बनकर (८.६५ कोटी), आमदार राहुल ढिकले (८.७६ कोटी) आणि डॉ. राहुल आहेर (०.४३), खासदार डॉ. शोभा बच्छाव (२.११) या विद्यमान लोकप्रतिनिधींसह माजी खासदार देविदास पिंगळे (८.६५ कोटी), माजी आमदार जे. पी. गावित (७.२१), माजी आमदार नरेंद्र दराडे (८.८९), शिरिषकुमार कोतवाल (१.९८) , वसंत गिते (१.८९) यांसह माणिकराव शिंदे (०.६७), राजेंद्र भोसले (८.७८), राघो अहिरे (८.८९), दत्ता गायकवाड (०.६७), गणपतराव पाटील (८.८९), संदीप गुळवे (७.५७), राजेंद्र डोखळे (८.८९), चंद्रकांत गोगड (१.३२) यांचा समावेश आहे.
जिल्हा बँकेकडून तीन साखर कारखाने आणि रेणुका सुत गिरणीसह अन्य कर्ज वाटपासंबंधीच्या अपिलातील ही सुनावणी आहे. नाशिक साखर कारखान्याची ७० कोटींची साखर बँकेकडे तारण होती. ती नऊ कोटींना विकली गेली. ही साखर विकणारे कोण होते, त्याची चौकशी होऊन कारवाई व्हायला हवी, असे राजेंद्र भोसले (माजी संचालक, नाशिक जिल्हा बँक) यांनी सांगितले.