साईमत, धुळे, प्रतिनिधी
येथील सुरत – नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सुरतकडून नागपूरकडे येणारा अवजड मालवाहतूक कंटेनर (एनएल ०१, एई ७७७०) व नेर येथील दुचाकी (एमएच ४१, एएच ५५७९) यांचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीचालक पित्यासह चिमुरडीचा मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली.दुचाकीस्वार देवा भिल (वय ४२), भटाबाई श्रीराम सूर्यवंशी (वय ६६), पूनम छोटू माळीच (वय १४) हे महालकाळी शिवारात वास्तव्यास होते. ते बाजारासाठी नेर येथे आले होते. घरी परतीच्या मार्गावर असताना रस्ता ओलांडताना राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव येणाऱ्या मालवाहतूक कंटेनरने त्यांना ओढत नेले. यात दुचाकीचालक देवा भिल, मुलगी पूनम माळीच जागीच ठार झाले. वृद्ध भटाबाई श्रीराम भिल गंभीर जखमी झाल्या. त्यांना धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. कंटेनरचालक अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला आहे.
ग्रामस्थांकडून रास्ता रोको
मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणारा कर्ता देवा भिल यांचा मृत्यू झाल्यामुळे आदिवासी कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत मिळावी, यासाठी ग्रामस्थांनी सलग तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हा पोलिस उपअधीक्षक साजन सोनवणे, धुळे तालुका पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
शासकीय मदतीचे आश्वासन
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अभियंता निखिल महाले हेदेखील घटनास्थळी पोचले. येथील ग्रामस्थांनी मृत कुटुंबाच्या मदतीची मागणी केली. तसेच गंभीर जखमी भटाबाई भिल यांना आवश्यकता असल्यास खासगी रुग्णालयात उपचार करण्याची हमी घेतली. अभियंता महाले, उपअधीक्षक सोनवणे यांनी मृत देवा भिल, पूनम माळीच यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून आदिवासी कुटुंबाला शासकीय मदतीचे आश्वासन दिले.आश्वासनानंतर ग्रामस्थांनी मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून शासकीय हिरे महाविद्यालयात नेण्याची परवानगी दिली. रस्ता सुरळीत मोकळा करून देण्यासाठी ग्रामस्थांनी मदत केली. अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी नेर येथील जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते, दीपक खलाणे, देवीदास माळी, डॉ. सतीश बोडरे, नामदेव बोरसे, गोकुळ श्रीराम, अनिल सूर्यवंशी, अमोल खैरनार, सिद्धांत गुजराथी, सुनील भिल, दीपक मोरे, रवी मोरे आदी उपस्थित होते.