बालोद्यान पुन्हा सुरू करण्याची मागणी
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
शहराच्या भडगाव रोड परिसरातील उच्चभ्रू रहिवाशी भागातील आणि विशेषतः विद्यमान आमदार, माजी आमदार यांचा रहिवास असलेल्या व राजकीय केंद्रबिंदू असलेल्या प्रभागातील शासकीय विश्रामगृहाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या महाराजा सयाजीराव गायकवाड बालोद्यानाच्या सद्यस्थितीत झालेली दुरावस्थेकडे प्रभागातील आजी- माजी नगरसेक आणि नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील पंधरा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी साकारलेल्या उद्यानाला अवकळा आली आहे.
गतकाळात दिलीप वाघ आमदार व नगराध्यक्ष असतांना २०१० मध्ये त्यांनी या प्रभागातील रहिवाशी नागरिकांच्या मागणीचा विचार करून प्रभागातील (तेव्हाचा प्र. क्र.१ तर आताच प्र. क्र.८) नगरपरिषदेच्या ओपनस्पेस जागेचे सुशोभीकरण सोबतच याठिकाणी २८ : ८२ लाख रुपये खर्च करून पालिकेच्या माध्यामातून लहान मुलांना खेळण्यासाठी विवीध प्रकारची, खेळण्याचे साहित्य, फुलझाडे लावून हे बालोद्यान तयार केले होते.
बालोद्यानाचे उद्घाटन मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या हस्ते थाटामाटात पार पडले होते. बालोद्यान काही वर्ष सुरू होते. गार्डनची निगा, झाडांची देखभाल करण्यासाठी येथे सुरक्षा रक्षक केबिनही आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून हे बालोद्यान सुरू आहे की नाही, याचा थांगपत्ता ना आजी -माजी नगरसेवकांना, पालिकेच्या अधिकाऱ्यांना अश्या अवस्थेत बालोद्यानाला सद्या कुलुप ठोकण्यात आले आहे.
बालोद्यानचे पुन्हा नव्याने सुशोभीकरण करा
बालोद्यानचे पुन्हा नव्याने सुशोभीकरण करून लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी खुले करावे, म्हणून प्रभागातील युवा नेते सूरज वाघ यांनी काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांची भेट घेवून गार्डनची झालेली दुरवस्था आणि गैरवापराबाबत लक्ष वेधले. लवकरात लवकर बालोद्यानाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बालोद्यानाच्या दुरुस्तीच्या मागणीचा निर्णय पालिका प्रशासन केव्हा घेणार, याकडे लक्ष लागले आहे.