मनपाचे दुर्लक्ष ; सराफ बाजारातील डी.एच. प्लाझा मार्केटमध्ये पार्कींगच्या जागेवर अतिक्रमण

0
2

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

जळगाव महानगरपालिका शहरातील विविध मार्केटमधील पार्कींगचा प्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरली आहे. या प्रश्‍नावर अनेकवेळा संबंधित मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आवाज उठवूनदेखील त्याची दखल का घेतली जात नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. सुभाषचौक परिसरातील भवानी मंदिरासमोर असलेल्या डी.एच. प्लाझा या दुमजली मार्केटमधील पार्कींगच्या जागेबाबतही गेल्या नऊ वर्षापासून मनपाकडे वारंवार तक्रारी अर्ज करुन देखील अद्यापपावेतो कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे आता या मार्केटमधील 24 व्यावसायिकांनी एकत्रित येत या प्रश्‍नी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून न्याय मिळण्याची भूमिका घेतल्याचे वृत्त आहे.

डी.एच. प्लाझा या मार्केटमध्ये पार्कींगच्या जागेवर मार्केटचे मालक दिलीपकुमार हिराचंद यांनी गाळे बांधून भाडेतत्त्वाने दिले आहेत व पार्कींगच्या जागेवर खुलेआमपणे अतिक्रमण केले आहे. या मार्केटमधील बेसमेंटची जागा मंजुर नकाशाप्रमाणे पार्कींगची जागा असूनही या जागेचा पार्कींगकरीता व्यावसायिकांना वापर करू दिला जात नाही. या प्रश्‍नी मार्केटमधील श्री.मोरनी हाऊस ज्वेलर्सचे संचालक मिलींद जैन यांनी मार्केटमधील 24 व्यावसायिकांना एकत्रित करीत आवाज उठविला आहे. या संदर्भात या महिनाभरात मनपा प्रशासनाला दोन-तीन वेळा निवेदने देवून मार्केटचे मालक दिलीपकुमार जैन यांच्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र मनपा प्रशासन या प्रकरणी चुप्पी साधून केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. डी.एच. प्लाझा या मार्केटमधील पार्कींगच्या जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यात  येवून ते त्वरीत तोडण्यात यावे व व्यावसायिकांना पार्कींगसाठी व्यवस्था करुन द्यावी अशी मागणी मिलींद जैन यांच्यासह व्यापाऱ्यांनी केली आहे.

याबाबत मनपाने त्वरीत कार्यवाही न केल्यास सर्व व्यापारी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेवून याबाबत न्याय मिळावा अशी मागणी करणार असल्याचेही मिलींद जैन यांनी ङ्गसाईमतफशी बोलतांना स्पष्ट केले. या मार्केटमध्ये सोनी गोल्ड ज्वेलर्स, प्रमिला ज्वेलर्स, भवानी बेनटेक्स ज्वेलर्स, शा खेतमल ॲण्ड सन्स, प्रेम बॉक्स, निर्मल ज्वेलर्स, आर.आर. ज्वेलर्स, जे.जे. ज्वेलर्स, जमुना ज्वेलर्स आदी 24 व्यावसायिक असून पार्कींगची व्यवस्था नसल्यामुळे त्यांची फटफजीती होत आहे. मनपाला या प्रश्‍नी कधी जाग येणार? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here