पीएचडी प्रवेशासाठी मार्गदर्शन कार्यशाळांची गरज – प्र. कुलगुरू प्रो. एस. टी. इंगळे

0
8

साईमत : जळगाव : प्रतिनिधी

युजीसी च्या नियमानुसार उच्च शिक्षणात संशोधन कार्य करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘पीएच.डी. प्रवेश परीक्षा’ हा पहिला महत्वपूर्ण टप्पा असून तो पूर्ण केल्याशिवाय विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. परंतु आजवर पेपर क्र. १ मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा मार्गदर्शन कार्यशाळांची नितांत गरज आहे. ज्याद्वारे उच्च शिक्षणातील संशोधक विद्यार्थ्यांचे प्रमाण आपल्याला वाढवता येऊ शकते. असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रो. एस. टी. इंगळे यांनी केले.

विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेतील शिक्षणशास्त्र विभागाद्वारे आयोजित एक दिवसीय ‘पीएच.डी. प्रवेश परीक्षा’ पेपर १ या मार्गदर्शन कार्यशाळेत मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते. ही कार्यशाळा ‘पीएच. डी. प्रवेश परीक्षा’ २०२३ परीक्षेत बसलेल्या तसेच नेट व सेट अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त होती. या कार्यशाळेत एकूण ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. सदर कार्यशाळेच्या सुरवातीला ‘पीएच. डी. प्रवेश परीक्षेचे ’ स्वरूप व अभ्यासक्रमाचा परिचय डॉ. संतोष खिराडे यांनी करून दिला. त्यानंतर दिवसभरात चाललेल्या विविध सत्रांद्वारे परीक्षाभिमुख मार्गदर्शन केले गेले. यात संशोधन अभियोग्यता आणि गणितीय आणि तार्किक क्षमता या घटकावर डॉ. मनीषा इंदाणी, अध्यापन अभियोग्यता या घटकावर डॉ. संतोष खिराडे, उच्च शिक्षण प्रणाली या घटकावर डॉ मनीषा जगताप, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान या घटकावर डॉ. समाधान कुंभार आणि पर्यावरणीय जाणीव जागृती या घटकावर डॉ. स्वाती तायडे यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here