साईमत जळगाव प्रतिनिधी
नाशिक येथील टीसीएस कंपनीशी संबंधित कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनातून केंद्र सरकारने याबाबत तातडीने आणि कठोर पावले उचलावीत, तसेच संबंधित कायदे अधिक कठोर करावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी लँड जिहाद, कॉर्पोरेट जिहाद आणि लव्ह जिहाद यांसारख्या विषयांवर केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कायदेशीर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. या घटनांमुळे समाजात चिंता आणि अस्वस्थता निर्माण होत असल्याचा दावा करत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते.
टीसीएसशी संबंधित नाशिकमधील घटना अत्यंत निंदनीय असल्याचे नमूद करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने अशा प्रकारच्या कथित घटनांना आळा घालण्यासाठी कायदे अधिक प्रभावी आणि कठोर करण्याची गरज अधोरेखित केली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासनाने निवेदन स्वीकारले आहे.
या प्रकरणावर प्रशासन आणि केंद्र सरकार पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
