साईमत/ न्यूज नेटवर्क/ मुक्ताईनगर :
अवैधरित्या कंटेनरमधून वाहतूक होत असलेला गुटखा नाशिक आयजी पथकाच्या पोलिसांनी मुक्ताईनगर येथे शनिवारी, 20 जुलै रोजी सकाळी सहा वाजता पकडला. कंटेनरसह गुटखा असा एक कोटी सहा लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहे.
महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा अवैधरित्या कंटेनरमधून कोटा राजस्थान येथून भरून येत असलेला पानमसाला गुटखा मुक्ताईनगरमार्गे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात जात असताना नाशिक पोलीस महानिरीक्षक (आय जी) यांच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील बऱ्हाणपूर चौफुली येथे 20 जुलै रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास कंटेनरची तपासणी केली. तेव्हा त्यात गुटख्याच्या गोण्या आढळून आल्या. पोलीस पथकाने कंटेनर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये आणला.
मध्यप्रदेशातून मुक्ताईनगरकडे अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या गुटख्याची गोपनीय माहिती नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांना मिळाली होती. आयजी कराडे यांच्या पथकाने मुक्ताईनगर गाठत 20 जुलै रोजी पहाटे कोटा राजस्थान येथून डाक पार्सल लिहिलेल्या बंदिस्त कंटेनर (क्र.एचआर 55 एक्यू 3873) ची बुऱ्हाणपूर चौफुली येथे चौकशी केली. त्यात प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये पान मसाला आणि गुटखा आढळून आला. पोलिसांनी मिळालेल्या मालाची मोजणी केल्यावर 76 लाख 17 हजार 800 रुपयाचा गुटखा व तीस लाख रुपये किमतीचे कंटेनर असा एक कोटी सहा लाख 17 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे.
याप्रकरणी आयजी पथकाचे पोलीस नाईक प्रमोद मंडलिक यांच्या फिर्यादीवरून दिलीप बदलानी (रा.जळगाव), संतोष शर्मा (रा.दिल्ली), त्यागी (रा.जयपूर), मुबारक, नीलू पंजाबी (रा.भिवाडी, राजस्थान) आणि चालक लियाकत अली इस्लाम खान (रा.हरियाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते करीत आहे.
घाऊक विक्रेत्यांवर ठोस कारवाई करावी
विधानपरिषद आ.एकनाथराव खडसे आणि विधानसभेचे आ.चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी सभागृहात अवैध गुटख्याच्या संदर्भात आवाज उठविला होता. याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देत जिल्ह्यातील गुटख्याच्या घाऊक विक्रेत्यांवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
लोकप्रतिनिधींनी पकडून दिला होता गुटखा…
मध्यप्रदेशातून मुक्ताईनगरमार्गे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटख्याची तस्करी होत असल्याचे उघड आहे. एका वेळेस आ.एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथील बोदवड चौफुली चौकात अवैधरित्या गुटख्याची गाडी पोलिसांना पकडून दिली होती. यामध्ये 56 लाखाचा गुटखा होता तर आ.चंद्रकांत पाटील यांनी संत मुक्ताबाई महाविद्यालयाजवळ बऱ्हाणपूरकडून येणाऱ्या आणि गुटखा वाहून नेणाऱ्या वाहनाला पकडून दिले होते. त्यात 21 लाखाचा गुटखा होता.
‘तेरी भी चूप मेरी चूप’
मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरकडून महाराष्ट्रातील मुक्ताईनगरकडे येताना रस्त्यामध्ये मध्यप्रदेशातील व महाराष्ट्राच्या सीमेवर दोन चेक पोस्ट आहेत. अवैधरित्या गुटख्याची व अन्य अमली पदार्थांची वाहतूक करणारे ही वाहने चेक पोस्टवरून पास होतात तरी कशी? हा प्रश्न असून की तस्करी व्यापाऱ्यांना दुसरी चोरटी वाहतूक करणारे रस्ते ‘तेरी भी चूप मेरी चूप’ असे म्हणत मिळत असतील, यात शंका नाही.